श्री बंकटस्वामी महाविद्यालयात विस्तार केंद्राचे थाटात उद्घाटन संपन्न
निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन करणे मानवाचे आद्य कर्तव्य असावे – राजयोगी ब्रह्मकुमार नरेंद्रभाई
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील अजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या वतीने विस्तार केंद्राचे उद्घाटन व पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय राजयोग एज्युकेशन संशोधन सेंटरचे ब्रह्मकुमार नरेंद्र भाई यांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
हे जग प्रकृती आणि पुरुष यांच्यातील एक अद्भुत खेळ आहे असे म्हटले जाते आपले शरीर पाच तत्वांनी बनलेले आहे. पृथ्वी, पाणी, वायू ,अग्नी आणि आकाश निसर्गाने बनविलेले आत्म्याचे खेळ आहेत. आपले शरीर या पाच घटकांनी बनलेले आहे जेव्हा आपल्या भौतिक शरीरात पाच घटक सामंजस्य आणि समतोल असतात तेव्हा ते आरोग्य टिकून राहते. आणि सर्व अवयव योग्यरीत्या कार्य करतात जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा शरीराला रोग होण्याची शक्यता असते. ताप ,हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब इत्यादी असंतुलनाचे विविध प्रकटीकरण आहेत.
त्याचप्रमाणे जेव्हा बाह्य निसर्गातील हे घटक समतोल आणि सुसंगत असतात तेव्हा त्याला स्वर्ग म्हणतात. निसर्गातील सर्व घटक त्या काळात आनंदाचे स्रोत होते. जेव्हा हा समतोल आणि सामंजस्य हरवले तेव्हा निसर्ग हळूहळू दुःखाचा स्रोत बनला आणि आज आपण वेळोवेळी निसर्गाचा क्रूर चेहरा पाहतो. त्यामुळे पृथ्वीवरील मानवी जीवनाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणीय प्रदूषणामुळे आज ऍसिड रेन, ग्रीन हाऊस इफेक्ट, ओझोन थरातील छिद्र, हवामानातील बदल ,ध्रुवीय बर्फ वितळणे इत्यादी निष्काळजीपणाचा निसर्गाचा गैर फायदा घेतल्याने दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वांनी निसर्गाला जपणं त्याच आरोग्य चांगलं ठेवणं हे सर्वांचं आद्य कर्तव्य झालं पाहिजे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ शिवाजी मोरे तर व्यासपीठावर बाळासाहेब भाई बीड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे कदम भाई ,पिंगळे भाई यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ शंकर शिवशेट्टे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक डॉ सुनील त्रिभुवन यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ.मनोजकुमार नवसे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.