नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागात करिअर समुपदेशन कार्यक्रम संपन्न
नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत माजी विद्यार्थ्यांनी साधला संवाद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागात गुरुवार, दिनांक १२ व शुक्रवार १३ सप्टेंबर २०२४ रोजी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी करिअर समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी संवाद, इंडक्शन व ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना विभाग प्रमुख डॉ मोईज मन्नान हक यांनी जनसंवाद क्षेत्रातील नवनवीन संधी बाबत माहिती दिली. प्रवेश घेतलेले बहुतांश विद्यार्थी जनसंवाद क्षेत्रात नवीन असल्याने अभ्यासक्रमाचे विविध पैलू आणि या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबद्दल त्यांनी माहिती दिली. शिक्षक, व्यावसायिक तज्ञ आणि माजी विद्यार्थ्यांशी तपशीलवार चर्चा करणे याबाबत महत्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन पीटीआय नवी दिल्लीचे माजी वरिष्ठ संपादक व आयआयएमसी (अमरावती) चे माजी प्रादेशिक संचालक विजय सातोकर यांच्या हस्ते १२ सप्टेंबरला पार पडले.
विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक तथा विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ विजय खंडाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पाहुण्यांमध्ये बीबीसी मराठीच्या रिपोर्टर भाग्यश्री राऊत, टीव्ही 9 चे विदर्भ ब्युरो चीफ गजानन उमाटे, सोशल मीडिया प्रोफेशनल शशांक गट्टेवार आणि पीआर प्रोफेशनल अर्पण पठाणे यांचा समावेश होता. डॉ खंडाळ यांनी विद्यार्थ्यांना जीवन आणि करिअर बद्दल अमूल्य टिप्स दिल्या. या कार्यक्रमात विभागाच्या वार्षिक अंक ‘कॅम्पस’चे प्रकाशन करण्यात आले. करिअर समुपदेशन सत्रात, जनसंवाद व्यावसायिकांनी या क्षेत्रातील नवीन संधींची सद्यस्थिती मांडली. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम तयारी कशी करावी याबद्दल माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी, विभाग प्रमुख डॉ मोईज मन्नान हक यांनी विद्यार्थ्यांना विभाग, अभ्यासक्रमाची आवश्यकता, विभागाचे नियमित उपक्रम आणि सुविधांबद्दल माहिती दिली. दुसऱ्या सत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांनी आत्म-परिचय सादर केला. शेवटच्या सत्रात विभागातील सुमारे डझनभर माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केले.
संयोजक संघात प्रा मनोज काळे, कार्यालयीन कर्मचारी प्रकाश तिमांडे, अंकित जगताप आणि प्रसाद फुलबांधे तसेच विद्यार्थी प्रतीक्षा वासनिक, प्रियांशू चौधरी, दीपक कुशवाह, कौस्तुभ चव्हाण, अनिकेत उमक, सतीश सहारे, खुशी राठोड, अमोल राठोड, पायाल काळे, श्रद्धा महाजन, तनिष्या गजभिये, विजया कुंड आणि तनु पाटील यांचा समावेश होता.