दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात ऑरोफरीन्जियल डिस्फेजियावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

अन्न व द्रवपदार्थ गिळताना होणाऱ्या त्रासाबाबत उपाययोजनात्मक चर्चा

वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय कान, नाक व घसातज्ञ महिला संघटना, असोसिएशन ऑफ ओरो लॅरोन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया आणि हेड अँड नेक सर्जन्स विदर्भ यांच्या सहकार्याने ‘ऑरोफरीन्जियल डिस्फेजिया’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. तोंडाद्वारे तसेच गळ्यातून अन्न अथवा द्रवपदार्थ गिळताना होणाऱ्या त्रासावरील आधुनिक उपचारांबाबत या कार्यशाळेत सखोल चर्चा करण्यात आली.

सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात ज ने वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान, नाक व घसारोग विभागाद्वारे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन नागपूर येथील एम्सचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ गौरव मिश्रा, कार्यकारी संचालक डॉ तृप्ती वाघमारे, पदव्युत्तर संचालक डॉ जयंतवाघ, कार्यशाळा आयोजन समितीच्या अध्यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ श्रध्दा जैन, सहअध्यक्ष डॉ प्रसाद देशमुख, सचिव डॉ सागर गौरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ही कार्यशाळा डिस्फेजियाच्या रुग्णांवरील उपचारांना दिशा देणारी आणि रुग्णांच्या जीवनशैलीत सुधारणा घडविणारी राहील, असे प्रतिपादन यावेळी उपस्थित अतिथींनी केले. 

Advertisement

पोस्ट स्ट्रोक डिस्फेजिया आणि पोस्ट ऑन्को सर्जिकल व केमोरेिडिएशन डिल्फेजिया याचे व्यवस्थापन करण्यासाठी बहुविध दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेतील विविध सत्रात दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू व नागपूर येथील तज्ज्ञांनी ‘ऑरोफरीन्जियल डिस्फेजिया’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. मेडिसिन, भौतिकोपचार, वाचाउपचार, मेंदू शल्यचिकित्सा, कर्करोग चिकित्सा तसेच अर्धांगवायूनंतरचे पुनर्वसन यासंदर्भात प्रशिक्षण घेण्यास इच्छुक विविध वैद्यकीय विभागात कार्यरत देशभरातील १८० प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेतील प्रशिक्षण व परस्पर संवाद सत्रात या सर्वांचा सक्रिय सहभाग लाभला.   

या आयोजनासाठी अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे, प्रशासकीय महासंचालक डॉ राजीव बोरले, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय गायधने, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ चंद्रशेखर महाकाळकर यांचे मार्गदर्शन व सर्वतोपरी सहकार्य लाभले.

या आयोजनात डॉ चंद्रवीरसिंह, डॉ मेघा कावळे, डॉ आशिष दिसावल, किरण कांबळे, खुशबू कुंडू, कान, नाक व घसारोग विभागातील डॉक्टर तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page