माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे यांना ‘आयईटीई’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पन्नास वर्षाच्या कारकीर्दीचा ‘आयईटीई’ने केला सन्मान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, भौतिकशास्त्रज्ञ डॉ विजय पांढरीपांडे यांना ‘आयईटीई’च्यावतीने ‘लाईफटाईम ॲचिव्हमेंट ॲवार्ड’ अर्थात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पदार्थविज्ञान, अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स- रडार इंजिनिअरिंग या क्षेत्रातील अध्यापन व संशोधन यासाठी गेल्या पन्नास वर्षात डॉ पांढरीपांडे यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरर्स (IETE) या संस्थेच्या वतीने भोपाळ येथील आयईएस विद्यापीठाच्या सभागृहात शनिवारी (दि १४ ) हा कार्यक्रम झाला. यावेळी मध्यप्रदेशचे मंत्री आयदलसिंग कसाना, आयईटीईचे अध्यक्ष ए के सैनी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ पांढरीपांडे यांचे बीसीयुडीचे माजी संचालक प्राचार्य डॉ भागवत कटारे , डॉ अशोक मोहेकर, एमआयटीचे महासंचालक डॉ मुनीष शर्मा, डॉ कैलास पाथ्रीकर यांनी अभिनंदन केले आहे . व्यावसायिक शिक्षणातील भरीव योगदानाबद्दल त्यांना यापूर्वीच देवांग मेहता बिझनेस स्कूल अँवार्ड प्रदान करण्यात आले आहे. कुशल नेतृत्व, संशोधन, व्यावसायिक शिक्षणातील नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे यशस्वी संयोजन आदी विविध कामगिरीबद्दल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.