एमजीएम विद्यापीठ आणि लीभेर अप्लायन्सेस कंपनीमध्ये सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि लीभेर अप्लायन्सेस प्रा लि यांच्यामध्ये गुरूवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी एमजीएम ट्रस्ट कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. लीभर अप्लायन्सेस प्रा लि कंपनीच्यावतीने व्यवस्थापकीय वित्त संचालक हेमंत मालपानी यांनी तर एमजीएमकडून कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी, लीभेर अप्लायन्सेस प्रा लि यांचेकडून व्यवस्थापकीय वित्त संचालक हेमंत मालपानी, गणेश फिरके, अमोल राजपूत, दिनेश कटारिया तर एमजीएम विद्यापीठाकडून कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, संचालक परमिंदर कौर धिंग्रा, संचालक डॉ रणीत किशोर, संचालक डॉ अण्णासाहेब खेमनर, डॉ भक्ती बनवसकर देशमुख, प्राध्यापक व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राने एकत्र येणे ही काळाची गरज असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राची समकालीन काळातील गरज समजण्यास मदत होते. लीभेर ही जर्मनी येथील कंपनी असून आपला दर्जा जपत सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण प्रयोग राबवित कंपनी कार्यरत आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करीत असलेल्या दोन संस्था आज एकत्र आल्यामुळे याचा फायदा दोघांनाही होणार आहे. विशेषत: यांत्रिक आणि विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक लाभ होणार आहे.
एमजीएम विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी केलेली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना बहुविद्याशाखीय शिक्षण आपण उपलब्ध करून दिले आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण शिक्षण शिकता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढून ज्ञानात भर पडणार आहे. उद्योग विश्वात सुरू असलेले विविध प्रयोग त्यांना प्रत्यक्षपणे पाहता येणार असून ते यातून नावीन्यपूर्ण कल्पनांची निर्मिती करतील, असा विश्वास कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
कुलसचिव डॉ गाडेकर यावेळी बोलताना म्हणाले, एमजीएम विद्यापीठाने आत्ताच पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. एमजीएम गेल्या चार दशकांपासून विविध क्षेत्रात कार्य करीत आलेले आहे. एमजीएम विद्यापीठ विविध क्षेत्रातील संस्थांशी सामंजस्य करार करून विद्यार्थी हिताचे वेगगेगळे उपक्रम राबवित आले आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना संधीचे आणखी एक दालन खुले झाले आहे.
लीभेर आपली उच्च गुणवत्ता आणि दर्जा जपत कार्यरत आहे. आज या सामंजस्य करारामुळे आम्हाला एमजीएम विद्यापीठाशी जोडता आले याचा मनापासून आनंद आहे. लीभरचे छत्रपती संभाजीनगर हे मुख्य केंद्र असून येथे आमची उत्पादनांची निर्मिती केली जाते. या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थी कंपनीस भेट देऊन प्रत्यक्षपणे कामाची अनुभती घेऊ शकतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आंतरवासिता ही आम्ही उपलब्ध करून देत आहोत, असे प्रतिपादन लीभेर अप्लायन्सेस प्रा लि कंपनीच्यावतीने व्यवस्थापकीय वित्त संचालक हेमंत मालपानी यांनी यावेळी केले.
सामंजस्य कराराविषयी :
एमजीएम विद्यापीठ आणि लीभेर अप्लायन्सेस प्रा.लि. या दोन संस्थांमध्ये झालेल्या या सामंजस्य कराराच्या माध्यमातून दोन्ही संस्थांना याचा फायदा होणार आहे. आंतरवासिता, अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षण, प्रकल्प भेट, संशोधन, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन संशोधनास या माध्यमातून चालना मिळणार आहे. तसेच प्रकल्पाधारित शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, प्रकल्पाधारित शिक्षण, नाविन्यता, स्टार्टअप्स यासाठी या सामंजस्य कराराचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होत असताना विद्यार्थ्यांना स्वत:च्या क्षमतांना आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना न्याय देण्यासाठी वाव मिळणार आहे.