भारतीय टपाल खात्याप्रमाणे मुक्त विद्यापीठाची सर्व थरातील जनतेशी नाळ जुळलेली
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गणेश मंडळातर्फे आयोजित मानाची श्रीगणेश महाआरती भारतीय केंद्रीय टपाल खात्याचे नाशिक विभागाचे प्रवर अधीक्षक प्रफुल्ल र वाणी यांच्या हस्ते करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख अतिथि म्हणून बोलतांना प्रवर अधीक्षक वाणी म्हणाले की बारतीय टपाल खाते हे लहान थोर अशा सगळ्या भारतीय नागरिकांच्या सेवेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. साधे टपाल असो किंवा जनतेने टपाल खात्याच्या विविध योजनांमध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक असो, या प्रत्येक सेवेमध्ये भारतीय जनतेस सुरक्षितता अनुभवास आली असून भारतीय टपाल खात्याने आपली विश्वासार्हता जपलेली दिसून येते. भारतीय टपाल खात्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सर्व थरातील जनतेशी नाळ जुळलेली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच आगामी काळात विद्यापीठ आवारात भारतीय टपाल खात्यातर्फे दोन दिवशीय शिबीर आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी विद्यापीठ आवारातील टपाल कार्यालयासह एकूणच भारतीय टपाल खात्याकडून विद्यापीठास मोलाचे सहकार्य लाभत आल्याचे सांगत त्यांच्या प्रती विद्यापीठाकडून आभार व्यक्त केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड व वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे हस्ते प्रमुख अतिथि यांचा विद्यापीठाच्या वतीने शाल, श्रीफळ, आंब्याचे रोप व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ गणेश मंडळाच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापन मंडळ सदस्या प्रा डॉ संजीवनी महाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठाच्या व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक तथा प्रभारी नियोजन अधिकारी डॉ राम ठाकर, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक, प्रा प्रकाश देशमुख, विद्यापीठ आवारातील टपाल खात्याचे उप डाकपाल विजय वाघ यांच्यासह विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलसचिव दिलीप भरड यांनी आभार मानले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांनी प्रमुख अतिथि यांचे स्वागत केले.