उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहांना कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांची भेट
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी वसतिगृहात बी टेक प्रथम वर्षाचा विद्यार्थी प्रतिक गोरडे याने केलेल्या आत्महत्ये नंतर विद्यापीठाने वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्ची होवू नये यासाठी तातडीने काही उपाय योजना केल्या आहेत.
गुरूवारी सकाळी कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे यांनी मुलांच्या तीनही वसतिगृहांना भेटी दिल्या. त्यानंतर वसतिगृहाचे चिफ रेक्टर, रेक्टर तसेच मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक यांची बैठक घेतली. तसेच विद्यापीठ प्रशाळांच्या सर्व संचालकांची बैठक घेवून विद्यार्थ्यांना विशषेत: प्रथम वर्षातील प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्यासाठी प्रशाळांमधील सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत अशा सूचना कुलगुरूंनी या बैठकीत दिल्या.
विद्यार्थी वसतिगृहाला भेट देतांना कुलगुरूंनी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरूस्त रहावे यासाठी योगा विभाग, हार्टफुलनेस मेडिटेशन तसेच ओपन जिम, आरोग्य केंद्र, क्रीडा संकुल याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. सिनीयर विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांशी मैत्री करून त्यांना एकटेपणा जाणवणार नाही याबाबत काळजी घ्यावी. अशा काही सूचना कुलगुरू प्रा माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना केल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधणाच्या दृष्टीकोनातून गुरूवारी सायंकाळी मुलांच्या वसतिगृहात व शुक्रवारी मुलींच्या वसतिगृहात बैठक घेवून विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करावे. अशा सूचना कुलगुरूंनी रेक्टरांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पुढील आठवड्यात मानसशास्त्रीय चाचण्या घेण्यात येणार आहेत. मानसशास्त्र विभागाच्या प्रा वीणा महाजन या देखील दोन्ही वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. विद्यापीठात मानसेवी तत्वावर दोन मानसोपचार तज्ज्ञ नेमण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी यावेळी सांगितले.
प्रशाळांच्या संचालकांच्या बैठकीत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. इंडक्शन कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विद्यापीठाची संपूर्ण माहिती दिली जाते. तसेच एकमेकांशी परिचय करून देत वातावरण मैत्रीपूर्ण केले जाते. मानसरंग क्लब तसेच मनकौशल्य योजना याद्वारे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल समुपदेशन केले जाते. प्रत्येक प्रशाळांमध्ये ‘माय सिक्रेट बॉक्स’ ठेवण्यात येतो यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या सिक्रेट भावना, व्यक्तीगत विचारलेले प्रश्न यांचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते. अशी माहिती या बैठकीत संचालकांनी दिली.
गुरूवारी सर्व प्रशाळांमध्ये प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची बैठक घेवून त्यांच्याशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी जाणून घेत मार्ग काढावा, प्राध्यापकांमधून व सिनीअर विद्यार्थ्यांमधून वर्गनिहाय मेंटार नेमावेत, शासकीय तसेच विद्यापीठातील हेल्पलाईन क्रमांक प्रत्येक प्रशाळांच्या व प्रत्येक वसतिगृहाच्या प्रथम दर्शनी भागात सूचना फलकावर लावाव्यात अशा सूचना कुलगुरूंनी या बैठकीत केल्या.