बाईमाणूसच्या पत्रकार वर्षा कोडापे यांना लाडली मीडिया पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय पुरस्कृत बाईमाणूस या वेब पोर्टलच्या पत्रकार वर्षा कोडापे यांना पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेद्वारे दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘लाडली मीडिया अवॉर्ड’ हा पुरस्कार ठाणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार पत्रकारितेतील लिंगानुभाव संवेदनशील वार्तांकनासाठी शोध पत्रकारिता या विभागांतर्गत दिला गेला आहे.

माध्यम क्षेत्रात महिलांचे प्रश्न घेऊन एक स्वतंत्र माध्यम व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ हे पोर्टल करीत आहे. बाईमाणूसच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून वर्षा कोडापे या काम करतात. आदिवासी गोंड समाजातून येणाऱ्या वर्षा या बाईमाणूसच्या लाडली मीडिया पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या दुसऱ्या प्रतिनिधी ठरल्या आहेत. बाईमाणूस या माध्यम समूहाला सलग दुसऱ्या वर्षी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील वर्षी सुमित्रा वसावे या बाईमाणूसच्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रतिनिधीला हा पुरस्कार मिळाला होता.

या पुरस्कार सोहळ्यात भारतातील एकूण ७४ पत्रकारांना लाडली मीडिया पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चंद्रपूरच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणामुळे व हवामान बदलामुळे पुरूषांमधील वांझपणात वाढ झाल्यासंबंधीचा विशेष ग्राउंड रिपोर्ट वर्षा कोडापे यांनी केला होता. यासाठीच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

Advertisement

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वर्षा कोडापे यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, प्राचार्या डॉ रेखा शेळके, संपादक प्रशांत पवार, अविनाश पोईनकर, सुरज पटके, ॠषिकेश मोरे व सर्व संबंधितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्षा कोडापे यांच्या रिपोर्टमधील महत्वाच्या बाबी :

चंद्रपुरातील विविध घटकांतील महिला, पुरूष, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांच्याशी संवाद साधून हवामान बदलाचा व औष्णिक विद्युत केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होत आहे, यासंबंधीच्या प्रतिक्रिया या रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद करून त्यामागच्या कारणांचा शोध घेतला होता. मूल होत नसल्याने एका पुरूषाने तिच्या पत्नीला मारून टाकल्याच्या चंद्रपुरातील घटनेचा यामधे उल्लेख करण्यात आला होता. अगदी कमी वयात मुलींना येणाऱ्या पाळीची समस्या, प्रदूषणकारी घटकांमुळे पुरूषांच्या जननक्षमतेवर होणारा परिणाम यासंबंधीचा विस्तृत आढावा या रिपोर्टमधून घेण्यात आला आहे. याचीच दखल घेत यावर्षीचा लाडली मीडिया पुरस्कार त्यांना मिळाला.

लाडली मीडिया पुरस्काराविषयी :

पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेद्वारे २००७ सालापासून हा पुरस्कार दिला जातो. पॉप्युलेशन फर्स्ट ही एक स्वयंसेवी संस्था आहे. लिंगानुभाव संवेदनशीलता संबंधी असणाऱ्या ‘प्रिंट व डिजिटल मीडिया’ तसेच रेडिओ वरील वार्तांकन यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यासाठी ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ द्वारे देखील या पुरस्कारासाठी साहाय्य केले जाते.

कोट : हे वार्तांकन करीत असताना आपल्याला यासाठी  पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं. माझा उद्देश एवढाच होता की, सामान्य माणसाची समस्या मांडत त्यास न्याय मिळवून द्यायचा. हा पुरस्कार मिळाल्याने सामान्यांचे प्रश्न मांडायला आणखी हुरूप आला आहे. पर्यावरण विषयक पत्रकारितेला जास्तीत जास्त प्राधान्य देणे समकालीन काळामध्ये अधिक गरजेचे आहे. वर्षा कोडापे (पुरस्कारार्थी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page