एमजीएम विद्यापीठात चित्रपट चावडीमध्ये ‘दिशा स्वराज्याची’ या माहितीपटाचे होणार प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर : यशवंतराव चव्हाण सेंटर, एमजीएम वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय व एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमात आचार्य विनोबा भावे जयंतीनिमित्त ‘दिशा स्वराज्याची’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. वीरेंद्र वळसंगकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. एमजीएम कॅम्पस येथील चित्रपती व्ही शांताराम प्रेक्षागृह येथे शनिवार दि १४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता सदरील माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

Advertisement

मेंढा (लेखा) हे गडचिरोली जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. या गावाने एकत्र येऊन आपल्या गाव भोवतालच्या जल, जंगल जमीन वरील अधिकार मिळवला आहे. अशा रीतीने वनाधिकार मिळवणारे ते भारतातील पहिले गाव ठरले आहे. एका छोट्याशा गावाने एकत्र येऊन गावचा कारभार कसा चालवता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे. ‘दिशा स्वराज्याची’ हा माहितीपट या गावाच्या संघर्षाची कथा सांगते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत मेंढा-लेखाची कथा अत्यंत अर्थपूर्ण आहे. जिथे लोक जागृत होऊन स्वतःचे निर्णय घेतात तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही चालते. विकेंद्रित कारभारामुळे प्रजासत्ताकाचे स्वप्न साकार होते. विदर्भ भूदान ग्रामदान सहयोग समिती यांनी माहितीपटाची निर्मिती केली आहे.

या प्रदर्शनास प्रवेश सर्वांसाठी खुला असून रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page