जैवविज्ञानमधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सोलापूर विद्यापीठाचा दोन संस्थांशी सामंजस्य करार
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन व प्रशिक्षणासाठी सीमा बायोटेक, कोल्हापूर आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, सोलापूर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रा प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ व्यवस्थापन सभागृहात झालेल्या कराराप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, जैवविज्ञान संकुलाचे संचालक प्रा डॉ विकास पाटील, सीमा बायोटेकचे संचालक विश्वास चव्हाण, इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चरचे डॉ पुरुषोत्तम पाथरोटी, विद्यापीठाचे कायदा अधिकारी ऍड जावेद खैरदी तसेच जैवविज्ञान संकुलामधील डॉ प्रिया अय्यर, डॉ रोहिणी शिवशरण, राजश्री अक्कलकोटे आदी उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन व प्रशिक्षण मिळावे, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले. सीमा बायोटेकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर याविषयी अधिक अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्यांच्या बांबू प्रकल्प संशोधनावरही विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, असे प्रा डॉ विकास पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्चच्या विविध प्रकल्प व उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांना संशोधन व अभ्यास करण्यास मिळणार आहे. त्यांच्या मिलेट रिसर्च (तृणधान्य संशोधन) याविषयी नवीन तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.