उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा
जळगाव : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पथनाट्याला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
जागतिक आरोग्य संघटनेकडून दि १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येला प्रतिबंध बसावा व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मानसशास्त्र विभागाच्या वतीने विद्यापीठ परिसरातील विविध प्रशाळांच्या परिसरात पथनाट्य सादर केले. त्यासोबतच आत्महत्या रोखण्यासाठी विविध मदत केंद्र, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ यांची मदत घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पथनाट्य सादरीकरण प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा जगदीश पाटील, कला व मानव्य विद्या प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ रामचंद्र भावसार, मानसशास्त्र विभागातील डॉ विना महाजन आदी उपस्थित होते.