एमजीएम विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

विद्यार्थ्यांनी या देशाचा एक चांगला नागरिक बनणे आवश्यक – पद्मश्री डॉ जहीर इसाक काझी

छत्रपती संभाजीनगर : भारत हा जगातील सर्वात तरूण देश असून देशातील तरुणांनी उपलब्ध संधीचा योग्यप्रकारे लाभ घेणे आवश्यक आहे. तरुणांनी आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात शिक्षण घेत समर्पण भावनेने काम करीत राहिले पाहिजे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांनी जागरूक राहत एक चांगला माणूस बनत असताना या देशाचा एक चांगला नागरिकही बनले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ जहीर इसाक काझी यांनी येथे केले.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री डॉ जहीर इसाक काझी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पद्मश्री डॉ जहीर इसाक काझी म्हणाले, एमजीएम विद्यापीठ हे सर्वांसाठी आदर्श असे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. मी देशभर फिरत असतो मात्र, एमजीएमने ज्या पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी केलेली आहे, तसे मला इतरत्र कुठेही पाहावयास मिळाले नाही. आपली सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक दृष्टिकोनातून एमजीएम आणि अंजुमन ए इस्लाम या दोन्ही संस्था काम करीत आहेत.

शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत असतात. शिक्षक चांगले अभियंते, डॉक्टर्स बनविण्यासह ते विद्यार्थ्यांना एक चांगला माणूस बनवत असतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान ठेवायला हवा. शिक्षक हा चांगला आणि वाईट असा काही नसतो. तो एकतर चांगला असतो अन्यथा, तो अधिक चांगला असतो. शेवटी, शिक्षक हा शिक्षक असतो असे यावेळी पद्मश्री डॉ जहीर इसाक काझी यांनी सांगितले.

पुढे बोलत असताना पद्मश्री डॉ जहीर इसाक काझी म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान ज्यावेळी बाजारात येते त्यावेळी त्याचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम असतात. आपल्यासाठी ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या आपण नाकारत त्यातील जे चांगले आहे, ते स्वीकारले पाहिजे. आपण कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो, यावर ते तंत्रज्ञान चांगले की वाईट हे ठरते. ही बाब समाज माध्यमांसंदर्भातही लागू पडते.  

Advertisement

वर्धापन दिनानिमित्त खालील संस्थांचे उद्घाटन करण्यात आले.

आर्टिफिशियल इंटेलिजियन्स क्लासरूम : एमजीएम विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी येथे एआय क्लासरूमचे मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या  क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती आपल्याला समजेल अशा इंग्रजी, मराठी, हिंदी, चायनीज, जापनीज, उर्दू, गुजराती व स्पॅनिश इ. भाषांमध्ये शिकता येणार आहे. विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना या सुविधेचा फायदा होणार आहे. या तंत्रज्ञानाची निर्मिती विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा जयानंद कांबळे व विद्यार्थी प्रसाद वखरे यांनी केली आहे.

एमजीएम प्रकाशन संस्था : एमजीएम विद्यापीठाने समकालीन काळाची गरज ओळखून स्वत:ची प्रकाशन संस्था सुरू केली आहे. आज मान्यवरांच्या हस्ते या प्रकाशन संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून आता प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व सर्व संबंधित आपले स्वत: चे पुस्तक प्रकाशित करू शकणार आहेत.

फाऊंडेशन ऑफ डेटा सायन्स : अ कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईड फॉर अनॅलिस्ट : फाऊंडेशन ऑफ डेटा सायन्स : अ कॉम्प्रेहेन्सिव्ह गाईड फॉर अनॅलिस्ट पुस्तक डॉ.शर्वरी तामणे, डॉ ए सेल्वाराज व डॉ मीनाक्षी राजपूत यांनी लिहिले असून आज मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे एमजीएमच्या प्रकाशन संस्थेचे पहिले पुस्तक आहे.

म्युझिकोलॉजीकल माईंडस्केप्स : अधिष्ठाता गुरू पार्वती दत्ता यांनी लिहिलेल्या ‘म्युझिकोलॉजीकल माईंडस्केप्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

समुपदेशन केंद्र :एमजीएम विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाकडून विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आज मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. रोज दुपारी ०२:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत सुरू असणार आहे. तज्ञ मार्गदर्शक व विषयतज्ञ येथे मार्गदर्शन करणार आहेत.

एआय इनोव्हेशन सेंटर : एआय इनोव्हेशन सेंटर पावर्ड बाय डिस्कव्हर एआयचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

चिंतनगाह परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी ध्वजारोहण आणि विद्यापीठ गीतगायन संपन्न झाले. प्रमुख पाहुण्यांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून गार्ड ऑफ देण्यात आला.एमजीएम विद्यापीठाच्या वाटचालीची संपूर्ण माहिती यावेळी माहितीपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आली. आज मान्यवरांच्या हस्ते ‘एमजीएम अभिव्यक्ती २०२४’ या न्यूजलेटरचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ‘एमजीएम इन्स्पायर’ अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपा देशपांडे व प्रा मोहसीन अंसारी यांनी केले तर आभार प्रा शिव कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page