‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ पवार यांची इंग्लंड येथे फेलो म्हणून निवड

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक प्रा डॉ ज्ञानेश्वर दादाजी पवार यांची जगविख्यात इंग्लंड मधील रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली आहे.

रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची स्थापना सन १८२० साली झाली आहे. खगोलशास्त्र खगोलभौतिकी आणि तत्सम शाखांचा अभ्यास व संशोधन विस्तार ई महत्त्वाची कार्य या सोसायटीद्वारे पार पाडली जातात. सोसायटीचे आज तगायात सुमारे ४००० फेलोज असून त्यातील एक चतुर्थास फेलो हे इंग्लंड बाहेरील आहेत. या सोसायटीचे फेलो म्हणून महाराष्ट्रातील खूप कमी विद्वानांना संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या पंक्तीत विराजमान होण्याची संधी डॉ ज्ञानेश्वर पवार यांना प्राप्त झाली आहे.  

डॉ पवार यांनी गणितीय खगोलशास्त्र, सापेक्षता सिद्धांत ई विषयावर मूलभूत संशोधन केले आहे. या विषयावर त्यांचे आज पर्यंत सुमारे १३० पेक्षा अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ विद्यार्थ्यांनी पीएचडी आणि ९ विद्यार्थ्यांनी एम.फिल पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधन कार्याची दखल यापूर्वी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस ने घेवून त्यांना यापूर्वीच फेलो म्हणून सदस्यत्व प्रदान केले आहे.

Advertisement

संशोधन कार्यात मग्न असताना देखील त्यांनी आपल्या प्रशासकीय कार्याची चुणूकही वेळोवेळी दाखवून दिलेली आहे. सन २०१५ पासून ते गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे सदस्य, विद्वत सभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य, गणित अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळाचे सदस्य, विद्यापीठाच्या नॅक तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे माजी संचालक या नात्याने त्यांनी गणित विषयातील ज्ञानवर्धनाचे अमूल्य कार्य पार पाडले आहे.

डॉ पवार यांची रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची फेलो म्हणून निवड झाल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. त्यामुळे खगोलभौतिक, सापेक्षता सिद्धांत यावरील संशोधनाची पातळी अजून उंचविण्याची संधी आपल्या विद्यापीठाला प्राप्त झालेली आहे. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.

या त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ एम के पाटील, डॉ रूपाली जैन, डॉ अनिकेत मुळे, डॉ नितीन दारकुंडे, डॉ बी सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ उषा सांगळे, उदय दिव्यवीर यांच्यासह सर्व गणित व विज्ञानप्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page