अमरावती विद्यापीठात ‘संत गाडगे बाबांची दशसूत्री व सेवाभावी संस्थांची भूमिका’ विषयावर कार्यशाळा संपन्न

सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून संत गाडगे बाबांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहचवावे – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

अमरावती : आपण समाजाला देणे लागतो ही भावना प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सातत्याने होत असून श्री संत गाडगे बाबांचे विचार व कार्य संस्थांनी समाजातील सर्वांपर्यंत पोहचवावे, असे आवाहनात्मक प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासन केंद्राच्यावतीने विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहात ‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे व सेवाभावी संस्थाची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते.

व्यासपीठावर उद्घाटक म्हणून संत गाडगे बाबा मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष बापुसाहेब देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून व्य प सदस्य डॉ व्ही एम मेटकर, विदर्भ महारोगी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुभाष गवई, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ दिलीप काळे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दोन्हीही क्षेत्रांची समाजाच्या हिताकरीता फार मोठी भूमिका आहे. संत गाडगे बाबांचे विचार व कार्य तळागाळातील सर्वांपर्यंत विशेषत: विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आणि गाडगे बाबांच्या दशसूत्रीच्या माध्यमातून दिलेले विचार सर्वांपर्यंत पोहचतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यावर चिंतन व कृती करण्याची आवश्यकता असून अध्यासनाच्या माध्यमातून दशसूत्रीवर आधारित विविध कार्यक्रम घेतले जातात.

Advertisement

आधार बहुउद्देशीय संस्था, बडनेरा, गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला, श्रीमती संगिता दामोदर पाटकर, बैलमारखेडा, जीवन विकास संस्था, परतवाडा, मातृछाया सामाजिक सेवा समिती, भंडारज, ग्रामपंचायत चोर माहुली, संजय माधव गुरव, खामगांव, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, अमरावती विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला व बालकल्याण विभाग, अमरावती, महिला आर्थिक विकास महामंडळ, अमरावती, भारतीय ग्रामीण आदिवासी विकास संस्था, लवादा, संत श्री गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्था, अमरावती, श्री गाडगे महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, पांढरकवडा, श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, आकोली बु ता पांढरकवडा या संस्थांनी केलेल्या संत गाडगे बाबांच्या विचार व कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कुलगुरू डॉ मिलींद बारहाते व इतर मान्यवरांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी संस्थांच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली.

उद्घाटक बापुसाहेब देशमुख म्हणाले, संत गाडगे बाबांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेला दिले. त्यांच्या दशसूत्रीचे कार्य आम्ही पुढे नेत आहोत. नागरवाडीला बाबांच्या जीवन व कार्यावर फार मोठे कार्य केले आहे. संत गाडगे बाबांच्या कार्याची सर्वांनी प्रेरणा घ्यावी, विचार आत्मसात करावेत. प्रमुख अतिथी डॉ अंबादास मोहिते यांनी सांगितले, संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीतील तत्वे सर्व नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत. राज्यघटनेत सुध्दा या तत्वांचा समावेश केला आहे. संत गाडगे बाबांचे शैक्षणिक कार्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांपर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे. 27 टक्के असलेला जीईआर 50 टक्क्याच्या वर वाढविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत आणि सर्व समाज शिक्षित करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निवाडाचे दाखले देऊन सामाजिक क्षेत्राला बळकट करावे व संत गाडगे बाबांच्या विचार व कार्याची अंमलबजावणी करावी, असे सांगून अध्यासन प्रमुख डॉ दिलीप काळे हे अध्यासनाच्या माध्यमातून बाबांचे विचार समाजापर्यंत पाहचवित असल्याचे सांगितले.

दाजीसाहेब पटवर्धन यांनी तपोवन संस्थेची स्थापना करुन आयुष्यभर सेवा केली. सर्वांकडे माणूस म्हणून बघा ही शिकवण त्यांनी दिली. संस्थेची स्थापना होऊन 75 वर्ष झाली आहेत. निरंतरपणे संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे. सर्वांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे विद्यापीठ यशस्वी प्रयत्न करीत आहे, असे डॉ सुभाष गवई विचार व्यक्त करतांना म्हणाले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिव्यामुक्त अभियानाविषयी डॉ अंबादास मोहिते यांनी उपस्थितांना शपथ दिली. प्रास्ताविकेतून अध्यासन प्रमुख डॉ दिलीप काळे यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. संचालन राजेश पिदडी यांनी, तर आभार डॉ भारत कल्याणकर यांनी मानले. कार्यशाळेला 72 सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, विद्यापीठ प्राधिकारिणींचे आजी व माजी सदस्य, गणमान्य नागरिक, समाजसेवक, विद्यार्थी, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page