मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सप्ताह
वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय ज्ञान प्रणालीवर व्यापक अभ्यास आणि संशोधनाची गरज
मुंबई : भारताला समृद्ध ज्ञान परंपरा लाभली आहे. ही ज्ञान परंपरा अनेक पीढ्यानपीढ्या प्रसारित होत असताना काही काळ त्यात खंड पडल्याने या ज्ञान प्रणालीबद्दल व्यापक जनजागृती करून भारतीय ज्ञान प्रणालीच्या सर्व व्यापक पैलूंचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास आणि आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळूरूचे प्रा. बी. महादेवन यांनी केले. समाजात व्यापक प्रमाणात या संपन्न ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून कला, साहित्य, कृषी, मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रात आपल्या देशाच्या समृद्ध वारसा आणि पारंपारिक ज्ञानाचा प्रसार हा सक्रियरित्या होणेही तेवढेच गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी सप्ताहच्या निमित्ताने भारतीय ज्ञान प्रणालीवर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते उपस्थितांशी संवाद साधत होते. कलिना संकुलातील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्यासह विविध प्राधिकरणातील सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, भारतीय ज्ञान प्रणाली जगातील सर्वोत्कृष्ट ज्ञानप्रणाली म्हणून गणली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. भारतीय ज्ञान प्रणालीला व्यापक पटलावर अधोरेखित करायचे झाल्यास भारतीय ज्ञान क्षेत्रात अनेक महत्वाचे शोध, दस्तऐवज, प्राचीन शिलालेख, स्थापत्य, बांधकाम अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकता येईल. गणितीय आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात भारतीय ज्ञान प्रणालीचे अनन्य साधारण महत्व आहे. त्याचबरोबर सिंचन आणि पाण्याचे व्यवस्थापन, स्थापत्यशास्त्र आणि धातू अशा विविध पैलूंवर सखोल अभ्यास आणि संशोधन यापूर्वी झालेले असून त्यातून समोर आलेले ज्ञान हे चिरंतनीय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. महादेवन यांनी अविरत संशोधन करून एक महत्वाचे दस्तऐवज म्हणून ‘Introduction to Indian Knowledge System – Concept and Applications’ ‘भारतीय ज्ञान प्रणालीचा परिचयः संकल्पना आणि अनुप्रयोग’ हे पुस्तक लिहले असून सुलभ संदर्भासाठी ते अनेकांना वापरता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी समृद्ध भारतीय ज्ञान प्रणालीवर विविध संदर्भ घेऊन तथा ते संदर्भ पुनश्च तपासून त्यावर आधारीत अभ्यासक्रमांची रचना करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पद्धतीचा वापर करणे गरजेचे असून त्या दिशेने मुंबई विद्यापीठाचे सर्व सलंग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कक्ष, युजीसी एचआरडीसी आणि आयक्युएसी कक्षामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.