श्रीचक्रधर स्वामींचा अवतरणदिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर विद्यापीठात विशेष परिसंवाद संपन्न
श्रीचक्रधर स्वामींचा अवतरणदिन मराठी भाषा दिनाशी जोडला जावा – डॉ अशोक राणा
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सूत्रे कालातीत – डॉ कोमल ठाकरे
भारतीय ज्ञान परंपरेत महानुभाव ज्ञान परंपरा उज्वल – डॉ संजय दुधे
नागपूर : मराठी साहित्याला समृद्ध व संपन्न करून मराठी भाषेचा गौरव करण्यामागे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींच्या अवतरणदिनी साजरा व्हावा, असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ अशोक राणा (यवतमाळ) यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनात बुधवार दिनांक दि ४ सप्टेंबर रोजी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरणदिनानिमीत्त ‘सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांची वर्तमानकाळातील प्रासंगिकता’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ अशोक राणा (यवतमाळ), डॉ कोमल ठाकरे (मराठी विभाग तायवाडे महाविद्यालय, नागपूर), नितीनराज बांधकर (योगेश्वर ग्रंथालय व हस्तलिखित केंद्र, नागपूर), विद्यापीठाचे मानव विद्या शाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरटी, भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख प्रा भारतभूषण शास्त्री आदी उपस्थित होते.
तत्कालीन काळातील सामाजिक परिस्थिती आणि आजच्या काळातील परिस्थिती सारखीच असल्यामुळे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांची जगाला गरज आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ कोमल ठाकरे यांनी केले. विचार ही कधीही जूनी न होणारी प्रक्रिया असून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सुत्र विश्वतोमुख असून त्यांना कुठल्याही प्रकारचा अवधी नाही, स्वामींचे प्रत्येक सुत्र त्रिकालाबाधित असून ते नुसते विचार सांगण्यासाठी नाहीत तर कृतीत उतरवण्यासाठी आहेत, असे विचार या परिसंवादाचे वक्ते नितीनराज बांधकर यांनी व्यक्त केले.
बदलत्या जीवनात धर्मतत्वज्ञानातील जीवन मुल्यांचा अंगीकार केला तर भारत जगांमध्ये सर्वात सुंदर देश होईल, भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये महानुभावांची ज्ञानपरंपरा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे विचार या परिसंवादाचे अध्यक्ष प्र-कुलगूरू डॉ संजय दुधे यांनी व्यक्त केले.
या परिसंवादाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख प्रा भारतभुषण शास्त्री, संचालन डॉ विजया राऊत यांनी केले तर आभार राजकुमार शेंडे यांनी मानले. या परिसंवादाला महानुभाव साहित्याचे अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.