नागपूर विद्यापीठाच्या महात्मा गांधी विचारधारा विभागात ग्रंथसमिक्षा व ग्रंथचर्चा संपन्न
गांधींना समजायचे असेल तर गांधींकडे परत जावे लागेल – माजी उप-प्राचार्य प्रो एस बी सिंग यांचे प्रतिपादन
नागपूर : महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असतील तर त्यांच्याकडे परत जावे लागेल, असे प्रतिपादन व्हीएमव्ही महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रो एस बी सिंग यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा गांधी विचारधारा विभाग येथे नारायण देसाई लिखित ‘माय गांधी’ या पुस्तकावर आधारित ग्रंथसमिक्षा व ग्रंथचर्चा शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडले. या कार्यक्रमात प्रो सिंग मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन पदव्युत्तर गांधी विचारधारा विभागातील माजी विद्यार्थी संघटनेने केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील शांती अध्ययन विभागातील माजी शिक्षक डॉ नृपेन्द्रप्रसाद मोदी होते. या कार्यक्रमात ग्रंथसमिक्षक म्हणून व्हीएमव्ही महाविद्यालयाचे माजी उप-प्राचार्य प्रो एस बी सिंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, महात्मा गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रा प्रमोद वाटकर यांची उपस्थिती होती.
नारायण देसाई लिखित ‘माय गांधी’ या पुस्तकाचे पुनवरालोकन करताना प्रो सिंग यांनी महात्मा गांधी हे प्रेममूर्ती असल्याचे सांगितले. ‘माय गांधी’ हे पुस्तक नारायण देसाई यांनी लिहिलेले आहे आणि ते १९९९ मध्ये प्रकाशित झाले होते. नारायण देसाई हे महादेवभाई देसाई यांचे पुत्र होते. ज्यांनी २५ वर्षे महात्मा गांधींचे प्रधान सचिव म्हणून काम केले. त्यांनी साबरमती येथे जवळपास २४ वर्षे घालवली. पुस्तकाचे वर्णन करताना उप-प्राचार्य प्रो सिंग म्हणाले, या पुस्तकाचे वर्गीकरण आत्मचरित्र, आत्मचरित्र, संस्मरण किंवा क्रॉनिकल असे केले जाऊ शकत नाही. परंतु पुस्तक सर्वांचे मिश्रण आहे. हे पुस्तक नारायण देसाई यांच्यावर महात्मा गांधींची छाप पाडणारे लेखन आहे, असेही ते म्हणाले. नारायण देसाई यांनी महात्मा गांधी यांना नेहमी तटस्थपणेच्या भूमिकेत पाहिले आहे. महात्मा गांधी हे जगासाठी महात्मा होते तर नारायण देसाई यांच्यासाठी मित्र होते, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ नृपेंद्रप्रसाद मोदी यांनी मनोगत व्यक्त करताना नारायण देसाई लिखित ‘माय गांधी’ या पुस्तकावर महात्मा गांधी अभ्यासकांनी सखोल अध्ययन करीत चर्चा करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी विचारधारा विभाग प्रमुख प्रा प्रमोद वाटकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रवी गुडधे यांनी केले. कार्यक्रमाला पदव्युत्तर महात्मा गांधी विचारधारा विभाग माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी व गांधी अभ्यासक उपस्थित होते.