हिंदी विश्वविद्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
युवकांमध्ये कौशल्य विकास आवश्यक – प्रो आनन्द पाटील
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार, 03 सप्टेंबर रोजी महादेवी वर्मा सभागृहात कुलसचिव प्रो आनन्द पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की रोजगारासाठी युवकांमध्ये कौशल्य विकास आवश्यक आहे. रोजगार मिळवण्याचे मार्ग आणि दिशा अनंत आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना कौशल्य विकास व रोजगाराची दिशा मिळणार असून त्यांना कार्यालयीन कामकाजाची माहिती मिळणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मार्गदर्शन करताना वर्धा येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास अधिकारी आर एच ठाकूर म्हणाले की युवकांना कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून तयार केले जात आहे जेणेकरून ते स्वावलंबी होवू शकतील. हा कार्यक्रम नियोजन प्रकोष्ठ आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योजकतेचे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देश्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजने अंतर्गत 12 वी पासून तर पदव्युत्तर (पोस्ट ग्रेजुएट) पर्यंतची शैक्षणिक योग्यता असणाऱ्या युवकांना 6 महिन्याचे प्रशिक्षण व विद्यावेतन महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. योजने अंतर्गत 18 ते 35 वर्ष वयोगटातील पात्र व निवड झालेल्या युवकांना दरमहा 6 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाणार आहे.
नियोजन प्रकोष्ठचे अध्यक्ष व जनसंचार विभागाचे असोशिएट प्रोफेसर डॉ राजेश लेहकपुरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी बी एस मिरगे यांनी केले तर दर्शन व संस्कृती विभागाचे सहायक प्रोफेसर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ सूर्यप्रकाश पांडे यांनी आभार मानले.
यावेळी डॉ रवींद्र बोरकर, डॉ कोमल कुमार परदेशी, डॉ वागीश राज शुक्ल, डॉ रणंजय कुमार सिंह यांच्यासह शोधार्थी व विद्यार्थी तसेच वर्धा व परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.