हिंदी विश्वविद्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
मंगळवारी हिंदी विश्वविद्यालयातील नियोजन प्रकोष्ठचा उपक्रम
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दुपारी 03:00 वा साहित्य विद्यापीठातील महादेवी वर्मा सभागृहात करण्यात आले आहे.

याविषयी माहिती देतांना विश्वविद्यालयातील नियोजन प्रकोष्ठ (प्लेसमेंट सेल) चे अध्यक्ष व जनसंचार विभागाचे असोसिएट प्रो डॉ राजेश लेहकपुरे यांनी सांगितले की महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योजकतेचे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्याच्या उद्देश्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजने अंतर्गत 12 वी पासून तर पदव्युत्तर (पोस्ट ग्रेजुएट) पर्यंतची शैक्षणिक योग्यता असणाऱ्या युवकांना 6 महिन्याचे प्रशिक्षण व विद्यावेतन महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. योजने अंतर्गत 18 ते 35 वर्ष वयोगटातील पात्र व निवड झालेल्या युवकांना दरमहा 6 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाईल.
या योजनेविषयी अधिक माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र सरकारचे अधिकारी युवकांना मार्गदर्शन करतील. कार्यक्रमास विश्वविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ लेहकपुरे यांनी केले आहे.