आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त रिल स्पर्धाचे आयोजन
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता रिल स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. दि 15 सप्टेंबर 2024 ही स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीची अंतिम तारीख असणार आहे. यात सहभागाचे कोणतेही शुल्क नाही.
विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या रिल स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय कामांबाबतचे रिल विविध समाजमाध्यमांवर प्रसिध्द झाल्यास बहुसंख्य लोकांना त्याची माहिती होईल सदर स्पर्धेत मोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रति-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे. पुण्यश्लोक अल्यिादेवी होळकर यांच्या लढवय्या बाणा, ग्रामीण विकास, लष्करी नेतृत्व, शैक्षणिक धोरण अशा विविध योजनेतून त्यांनी दिलेला लढा नक्कीच विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांच्या सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या राज्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धत सहभाग घेऊ शकतात. स्पर्धत सहभागी स्पर्धकाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक सुधारणा, पर्यावरण संवर्धन, कर प्रणाली, महसुल प्रणाली, जलसंधारण, वास्तुकला व शिल्पशास्त्र, ग्रामीण विकास, लष्करी नेतृत्व, शैक्षणिक धोरण, लढवय्या बाणा, बालशिक्षण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंधश्रध्दा निमुर्लन, सामाजिक अनिष्ठ प्रथांना विरोध, राजकीय नेतृत्व, वस्त्रोद्योगास चालना, नदीवरील घाट, विहिर यांचे निर्माण, वसतीगृह निर्मिती,
प्रशासन व्यवस्था या विषयावर माहिती देणारा किमान एक मिनिटाचा रिल तयार करुन स्वतःच्या फेसबुक, एक्स (व्टिटर), इन्स्टाग्राम, यु-टयुब आदी समाजमाध्यमांवर प्रसिध्द करावा.
या स्पर्धेबाबत विद्यापीठाचे www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर स्पर्धेची नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे अयोजित रिल स्पर्धा ऐच्छीक स्वरुपात असून स्पर्धक एकापेक्षा अधिक विषयावर रिल्स तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून अनुमती आहे. स्पर्धेत प्रथम विजेत्यास अकरा हजार रुपये बक्षीस तसेच व्दितीय क्रमांकासाठी सात हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार व उत्तेजनांर्थ दोन स्पर्धकांना दोन हजार रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून तसेच सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यापीठाने निर्देशित केलेल्या विषयांवर नियम व अटींचे पालन करुन स्पर्धकांनी समाजमाध्यमांवर प्रसिध्द केलेल्या रिलची लिंक muhsprsocialmedia@gmail.com या ई-मेलवर विद्यापीठाकडे पाठविणे अनिवार्य आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित रिल स्पर्धेत संलग्नित महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा याकरीता विद्यापीठाकडून परिपत्रकाव्दारे संलग्नित महाविद्यायांना कळविण्यात आले आहे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विद्यापीठाचा 0253-2539176 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.