नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या १०० माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
शिक्षणातूनच जीवन मूल्ये प्रगल्भ होतात – निवृत्त न्यायमूर्ती जे एन पटेल
नागपूर : आदर्श आचार विचारातून समृद्ध समाज निर्माण होतो. जीवन एक प्रवाह असून त्यातूनच चांगल्या वाईटाची ही जाण होत असते. म्हणूनच उत्तम शिक्षणाची पायाभरणी जीवन मूल्ये प्रगल्भ करीत असतात असे मत सेवानिवृत्त न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या १०० माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शताब्दी महोत्सव समारोप समारोहात करण्यात आला होता. काही अपरिहार्य कारणामुळे या सत्कार सोहोळ्यास निवृत्त न्यायमूर्ती जे एन पटेल, चित्रपट कलावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सोनू सुद, ज्येष्ठ अभिनेता शाहाबाज खान हे उपस्थित राहू शकले नसल्याने या मान्यवरांना त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पुरस्कृत करण्यात आले.
आम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे. आज आम्ही ज्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहोत त्याचे मूळ आम्हाला घडवीणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आहे, असे गौरवोदगार सोनू सुद आणि शाहाबाज खान यांनी या अनौपचारिक चर्चेदरम्यान व्यक्त केले. या प्रसंगी सोनू सुद यांनी त्यांचे ‘मै मसीहा नहीं’ हे पुस्तक भेट दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने माजी विद्यार्थी मंडळाच्या सचिव डॉ कल्पना पांडे आणि शताब्दी महोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रमोद तिजारे यांनी मान्यवरांना भेटवस्तू प्रदान केली. या प्रसंगी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यश जी चव्हाण, चित्रपट अभिनेता पराग भावसार आणि माजी विद्यार्थी मंडळाच्या सदस्य डॉ मनिषा यमसनवार उपस्थित होते.