नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे ‘मीडिया लेखन कार्यशाळे’चे उद्घाटन
लेखन कौशल्यातून विद्यार्थी स्वावलंबी होतील – डॉ शामराव कोरेटी
नागपूर : लेखन कौशल्यातून विद्यार्थी स्वावलंबी होतील, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी केले. विद्यापीठ हिंदी विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय ‘मीडिया लेखन कार्यशाळे’च्या उद्घाटन सत्रात शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी डॉ कोरेटी मार्गदर्शन करीत होते.
भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य आवश्यक असल्याचे पुढे सांगत कौशल्य विकासाचा हा काळ असल्याचे डॉ कोरेटी म्हणाले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लेखन कौशल्य आवश्यक आहे. यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे ते म्हणाले. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विशेष कर्तव्य अधिकारी एस पी सिंग यांनी मार्गदर्शन करताना प्रसारमाध्यमे समाजातील सत्य समोर आणतात, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख डॉ मनोज पांडे म्हणाले की, भाषेचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवणे याला विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य असले पाहिजे. कारण भाषा हे अनंत शक्यतांचे द्वार आहे. भाषा कौशल्यांमध्ये प्रवीण असलेले विद्यार्थी माध्यम आणि भाषांतर यांसारख्या क्षेत्रात सामग्री लेखनात अधिक सक्षम असतात.
कार्यशाळेच्या पहिल्या तांत्रिक सत्रात पत्रकार डॉ योगेश पांडे यांनी वृत्तलेखनाच्या कलेवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात आयकर विभागाचे राजभाषा उपसंचालक अनिल त्रिपाठी यांनी उपस्थितांना पत्रलेखनाच्या कलेचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेत विविध महाविद्यालये आणि विभागातील ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे संयोजक डॉ लखेश्वर चंद्रवंशी यांनी कार्यशाळेचे संचालन केले तर आभार डॉ एकादशी जैतवार यांनी मानले.