देवगिरी महाविद्यालयास उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय सन्मान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने देवगिरी महाविद्यालयास उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय सन्मान विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी आणि आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स पदक विजेत्या खेळाडू भाग्यश्री बिले यांच्या शुभ हस्ते देण्यात आला. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवगिरी महाविद्यालयाच्या वतीने हा सम्मान उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील आणि क्रीडा संचालक डॉ शेखर शिरसाठ यांनी स्वीकारला.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ क्रीडा नैपुण्यासाठी देवगिरी महाविद्यालयास विद्यापीठ कार्यक्षेत्रात सर्वात अधिक एकूण ९५ गुणांकन प्राप्त झाले आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आंतर-महाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धेत एकूण 38 सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी होत सांघिक क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस मुले, फुटबॉल मुले, सॉफ्टबॉल मुले, व्हॉलीबॉल मुली, बास्केटबॉल मुली, बास्केटबॉल मुले, क्रिकेट मुली आणि ॲथलेटिक्स ४ X १०० मीटर रिले रेस मुली क्रीडा प्रकारात एकूण आठ सांघिक विजेतेपद मिळवली तर क्रॉसकंट्री मुली, खो-खो मुली, ॲथलेटिक्स ४ X ४०० मीटर रिले रेस मुली आणि लॅान टेनीस मुले या चार संघांनी उपविजेतेपद मिळविले.
आंतर-महाविद्यालयीन वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत एकूण ३८ पदके मिळाली त्यात १६ सुवर्णपदक, १७ रौप्यपदक, ५ कांस्यपदक मिळाली. देवगिरी महाविद्यालयाच्या एकूण ३२ खेळाडूंची निवड विद्यापीठ संघात होऊन त्यांनी राज्य क्रीडा महोत्सव आंतर-विद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच महाविद्यालयाच्या एकूण ३८ खेळाडूंची निवड विद्यापीठाच्या विविध क्रीडा संघात होऊन त्यांनी दक्षिण-पश्चिम विभागीय आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच महाविद्यालयाच्या एकूण १६ विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठ संघात होऊन त्यांनी अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवला.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत रिद्धी हत्तेकर हिने वैयक्तिक ऑल राउंड रौप्यपदक आणि फ्लोवर एक्सरसाइज प्रकारात कांस्यपदक मिळवले. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्ध्येत सुकन्या जाधव आणि रुपाली वाघ यांनी सांघिक रौप्यपदक मिळवले. श्रंखला रत्नपारखी हिने मोहाली येथे झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक तसेच अमृतसर येथे झालेल्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला ज्युडो स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.
आसाम गुवाहाटी येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम मध्ये जुडो श्रृंखला रत्नपारखी हिने सहभाग नोंदवला. स्नेहा मदने हिने राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स (तिहेरी उडी) स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. नागपूर येथे झालेल्या राज्य क्रीडा महोत्सव आंतर विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत शुभम लाटे, प्रदीप लाटे, अभिषेक अंभोरे, नरेंद्र चौधरी, जयराज तिवारी यांनी सांघिक रौप्यपदक मिळवले. त्याच बरोबर जागतिक आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धा -२०२३ स्पर्ध्येत तुषार रावसाहेब आहेर यांने सहभाग नोदावला.
देवगिरीच्या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख डॉ शेखर शिरसाठ, ईशांत राय, गोरख कदम, अजय सोनावणे, पूजा सोळुंके, संदेश चिंतलवाड यांचे मार्गदर्शन लाभले. देवगिरी महाविद्यालय क्रीडा विभागाच्या या घवघवीत यशाबद्दल म शि प्र मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ विष्णू पाटील आदी देवगिरी परिवाराने अभिंनदन केले आहे.