सोलापूर विद्यापीठात क्रीडा दिनानिमित्त शुक्रवारी खेळाडूंचा होणार सन्मान

यंदाच्या वर्षी विद्यापीठास क्रीडा विभागात 33 पदके प्राप्त !

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुक्रवार, दि 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर विद्यापीठ

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा प्रकाश महानवर हे असणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Advertisement

भारतीय विश्वविद्यालय संघ आयोजित वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन, ऑल इंडिया, खेलो इंडिया व राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव तसेच आंतर विद्यापीठ विविध क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील 540 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विद्यापीठास 15 गोल्ड, 10 सिल्वर आणि आठ ब्रांझ पदके प्राप्त झाली. असे एकूण 33 पदके यंदाच्या वर्षी विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. जवळपास 82 खेळाडूंनी यशाचा झेंडा फडकविला. या खेळाडूंचा क्रीडादिनी विद्यापीठाच्यावतीने सन्मान केला जाणार आहे. तसेच यावेळी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरलेल्या महाविद्यालयाला पुरणचंद्र पुंजाळ फिरता चषक देऊन त्यांचाही सन्मान केला जाणार आहे.

तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये व विविध विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ काळवणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page