राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल’ मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
दृष्टीकोन बदला, यशस्वी व्हाल – प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे
भुगोल म्हणजे अवकाशीय विज्ञान – डॉ सुजाता डमके
नागपूर : स्वतःला कमी लेखण्याचा दृष्टिकोन बदला तरच जीवनात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे यांनी केले. ‘स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल’ कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील प्रो एल जी ग्वालानी स्मृती सभागृहात शनिवार, दि २४ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडला. यावेळी प्र-कुलगुरु डॉ दुधे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी भूषविले. यावेळी भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ कीर्तीकुमार रणदिवे, डॉ एस एम पोफरे, वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था (नागपूर) येथील डॉ सुजाता डमके, डॉ एस के हुमणे, डॉ बी एस मांजरे यांची उपस्थिती होती. भाषा ही अडचण नसून ज्ञान असेल तर सर्व शक्य आहे. सातत्याने प्रयत्न केल्याने अनेक गोष्टी शक्य होत असल्याचे डॉ दुधे पुढे बोलताना म्हणाले. प्रत्येक व्यक्ती संशोधक, कलावंत असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला जे जमते, ती कला जोपासणे महत्त्वाचे आहे. कार्य करीत रहा, मार्ग आपोआप मिळत जातात असे डॉ दुधे म्हणाले. अधिसभेचे सदस्य असताना विद्यापीठात भूगोल आणि समाजकार्य अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे याबाबत प्रस्ताव पारित करून घेतले होते. पुढे प्र-कुलगुरू झाल्यानंतर व्यवस्थापन परिषद विद्वत परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत घटनाक्रम त्यांनी उलगडला. संलग्न महाविद्यालयातून अभ्यासक्रम शिकताना अडचणी येतात. मात्र, विद्यापीठाने विभाग सुरू केल्यानंतर त्या पदवीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच जीवनात सात गोष्टींचे पालन केल्यास यशस्वी होण्याचा मार्ग देखील त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितला.
‘स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल’ या विषयावर बोलताना वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था (नागपूर) येथील डॉ सुजाता डमके यांनी भुगोल म्हणजे अवकाशीय विज्ञान असल्याचे सांगितले. भूगोलामध्ये पृथ्वीवरील भूपृष्ठभागाचा भौतिक आणि मानवी जगाचा अभ्यास केला जातो. विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती होत गेल्याने मानवी जीवन समृद्ध होत पृथ्वीच्या पृष्ठभागावर देखील बदल होत गेले. मानवी सभ्यतेच्या विकासाचे परिणाम दोन्ही ध्रुवांवर देखील दिसून येत आहे. त्यामुळे भूगोल विषयात भूगर्भशास्त्र, पर्यावरणशास्त्र, समुद्रशास्त्र आदी विविध अभ्यासक्रम स्वतंत्रपणे निर्माण झाले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच पृथ्वीच्या भूपृष्ठ भागावर झपाट्याने परिवर्तन होताना दिसून येत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या विषयावर अधिकाधिक अभ्यास होत असून सर्व विषयांची भूगोल ही माता असल्याचे डॉ डमके यांनी सांगितले.
त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना या विषयाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संघराज्य लोकसेवा आयोगाची तयारी करताना भूगोल हा महत्त्वपूर्ण विषय आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करताना भूगोल विषयाचा सर्वाधिक फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित भूभागाचा अभ्यास असेल तर आपण यशस्वी अधिकारी होऊ शकता, असे त्यांनी सांगितले. जीआयएस यासह इसरो मध्ये देखील जाण्याची मोठी संधी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना आहे. त्यामुळे ‘लोकल टू ग्लोबल’ विचार करण्याची क्षमता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी त्यांनी संघराज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ कीर्तीकुमार रणदिवे यांनी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. भूगोल हा विषय विज्ञान विषयाची संबंधित असून विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार एमएससी भूगोल हा अभ्यासक्रम सुरू केल्याचे सांगितले. पहिल्या बॅचमध्येच एका विद्यार्थिनीने सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याने अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ बी एस मांजरे, डॉ एस के हुमणे, डॉ ए एम पोफरे यांनी देखील मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विभागातील सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थीनी प्रणिता काळे, यशस्वी विद्यार्थिनी कहकशा अन्सारी, पलक वासनिक, विशाखा कंगाले, पूजा गायधने, चित्रा पिपरधरे, तनुश्री निकोरे, श्रेया मेश्राम, पूजा इलमकर आदी विद्यार्थिनींचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन चित्रा पिपरधरे, तनुश्री निकोरे व पूजा इलमकर या विद्यार्थिनींनी केले तर आभार श्रेया मेश्राम हिने मानले.