एमजीएम विद्यापीठात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीने राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ विलास सपकाळ म्हणाले, २०२४ च्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची थीम ‘चंद्राला स्पर्श करताना जीवनांना स्पर्श करणे : भारताची अंतराळगाथा’
(‘Touching Lives While Touching the Moon : India’s Space Saga’) अशी आहे. ही थीम समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाच्या खोल प्रभावावर भर देते. अवकाश संशोधनाचा समाजावर झालेला सकारात्मक परिणाम अधोरेखित करणे हा या राष्ट्रीय अंतराळ दिनाचा भारताचा उद्देश आहे आणि आगामी काळात एमजीएमच्या विद्यार्थ्यांनी आपला एक छोटा उपग्रह अंतराळात पाठवावा यासाठी संशोधन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी चांद्रयान मोहीम आणि राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला.