डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापनदिन थाटात साजरा
उच्चशिक्षणात महाराष्ट्र देशात अव्वल – उच्चशिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर
लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना ‘जीवनसाधना पुरस्कार’ प्रदान
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी यांची पाहुणे म्हणून उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर : राज्यात सरकारी व खासगी विद्यापीठांची संख्या ८३ वर पोहोचली असून एकूण ४३ लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. तर सुमारे दोन हजार महाविद्यालयांनी ‘नॅक’ मानांकन मिळवले असून उच्च शिक्षणातील दर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे, असे प्रतिपादन उच्चशिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापनदिन शुक्रवारी (दि २३) विविध कार्यक्रमांनी थाटात संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात मुख्य सोहळा झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर प्रख्यात लोककलावंत पांडुरंग घोटकर, प्रकुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, लोककलावंत कृष्णा मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रख्यात लोककलावंत, ढोलकीसम्राट पांडुरंग अण्णासाहेब घोटकर यांना जीवनसाधना पुरस्कार, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, कर्तबगार समाजसुधारकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. या मंडळीनीच शिक्षणाची पायाभरणी केली. स्वातंत्र्योत्तर काळातही हीच परंपरा आपण नेटाने पुढे नेत आहोत.
आजघडीला एक हजार ९२८ महाविद्यालयांनी ‘नॅक’ मानांकन मिळवले असून दर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही महाराष्ट्रच अन्य राज्यांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरेल यात शंका नाही. मात्र आत्ताचे उच्चशिक्षणातील खासगीकरणाचे प्रमाण निश्चितच चिंता वाढविणारे आहे. अनुदानित कोर्सपेक्षाही लाखोंचे शुल्क भरून विद्यार्थी खासगी विद्यापीठे, विना अनुदानित कॉलेजेसला का प्राधान्य देत आहेत, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. परंपरागत संस्था व अभ्यासक्रमात बदल केले नाहीत तर त्यांचा निभाव लागणे अवघड आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे पहिल्या पिढीतल्या पदवीधरांना शिक्षण देणारे असून आपण माजी विद्यार्थी अभ्यासल्याचा अभिमान आहे, असेही डॉ देवळाणकर म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल संजय शिंदे, सतीश दवणे, सुधाकर चव्हाण, जिज्ञासा दांडगे यांच्यासह गुणवंत कर्मचारी, विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रा पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी सकाळी नऊ वाजता मुख्य इमारतींसमोरील हिरवळीवर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वज फडकविण्यात आला.
विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख चढताच – कुलगुरु
दीक्षांत सोहळ्यात तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांनी आगामी दहा वर्षात देशातील ‘टॉप ५०’ विद्यापीठात स्थान मिळवावे, असे आवाहन केले होते. सर्वांच्या सहकार्याने सहा महिन्यातच ‘एनआयआरएफ’ची ४६ वी रँक मिळाली ही अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. पीएम उषा अंतर्गत शंभर कोटींचा निधीस अंतिम मान्यता मिळाली असून आजच ‘गो अहेड’ हा संदेश प्राप्त झाला असून विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख कायम चढताच राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक पायाभूत प्रकल्प व उपक्रम आगामी काळात सुरू करण्यात येतील, असे कुलगुरू डॉ विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले.
उच्च शिक्षणात परिवर्तन गरजेचे – डॉ कुलकर्णी
औद्योगिक क्षेत्रात ‘इंडस्ट्री ४.०, ५.०’ असे ट्रेंड आले आहेत . उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थानाही काळानुसार बदलणे अत्यंत गरजेचे असून स्पर्धेत टिकायचे असेल तर परिवर्तन हाच एकमेव संकल्प त्यांच्यासमोर ठेवावा लागणार आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले. ‘ ‘एनइपी-२०२०’ ही या परिवर्तनाची सुरुवात आहे. उद्योग क्षेत्राला व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेले शिक्षण , संशोधन व ज्ञानाचे उपयोजन गरजेचे आहे, असेही ते म्हणाले
जुगलबंदी रंगली, विनम्रता भावली
केवळ दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या कलावंताला केवळ ढोलकीमुळेच सातासमुद्रापार कार्यक्रमांची संधी मिळाली. मायबाप प्रेक्षकांनी पन्नास वर्षापासून दिलेले हे प्रेम मला हत्तीचे बळ देणार आहे. ढोलकी वाजवताना मरण आले तरी बेहतर आपण आता थांबणार नाही, या शब्दात लोककलावंत पांडुरंग घोटकर यांनी उपस्थितांना अक्षरशः दंडवत घातला. तसेच त्यांचे पुत्र कृष्णा मुसळे यांच्यासोबत ढोलकीवरील जुगलबंदीने रसिकांना खिळवून ठेवले. उभयतांना अनिल घोगरे यांनी साथ दिली. मधू कांबीकरांपासून ते प्रख्यात अभिनेत्री रेखापर्यंत अनेकांच्या गीतांना ढोलकीची साथसंगत देणाऱ्या या लोककलावंताची विनम्रता पाहून उपस्थित भारावून गेले.