उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरावरील तीन पुरस्कार जाहीर
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरावरील तीन पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा, याच महाविद्यालयातील डॉ अनिल बारी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून आणि विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचा विद्यार्थी जयेश साळुंके याला सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च् व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने सन २०२२-२३ चे राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला तीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. बोदवड येयतील दि बोदवड को-ऑप एज्युकेशन सोसायटी मर्या, बोदवड संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर झाला. याच महाविद्यालयातील डॉ अनिल बारी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळेअंतर्गत असलेल्या समाजकार्य विभागाचा विद्यार्थी जयेश साळुके हा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक ठरला आहे. राज्यशासनाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कार विजेत्यांचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील आणि रा से यो संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी अभिनंदन केले.