विद्यार्थी विकास निधी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे अमरावती विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाव्दारे सन 2024-25 करीता विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार असून सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना सत्र 2023-24 मध्ये शैक्षणिक गुणवत्तेबाबतची शिष्यवृत्ती मिळाली असेल व सत्र 2023-24 मध्ये एचएसएससी किंवा पदवी परीक्षा किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण केली असेल, असे विद्यार्थी अर्ज करु शकतात.
तसेच सत्र 2023-24 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी सुध्दा अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका ही मान्यताप्राप्त विद्यापीठ, शिक्षण मंडळाची असावी. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व बाजुने मिळणारे उत्पन्न 2,50,000 (रु दोन लक्ष पन्नास हजार रुपये) पेक्षा जास्त नसावे. शिष्यवृत्ती योजनेकरीता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.
सत्र 2023-24 वर्षाची गुणपत्रिका, मुळ उत्पन्नाचा नायब तहसीलदार / कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रमाणित केलेला सन 2023-24 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, अधिकृत अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेला जन्म तारखेचा दाखला, एनएसएस, एनसीसी, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सत्र 2023-24 मध्ये प्रतिनिधित्व केल्याबाबतचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. सदर योजनेकरीता पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या कोणत्याही वर्गात प्रवेशित असलेले विद्यार्थी सुध्दा पात्र राहतील.
विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्राप्त आवेदनपत्राची पडताळणी करुन नियमानुसार विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र आवश्यक त्या कागदपत्राच्या सत्यप्रती प्राचार्य / विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी साक्षांकित करुन सॉफ्ट कॉपी विद्यार्थी विकास विभाग कार्यालयाच्या सॉफ्टवेअरमध्ये दि 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत कॉलेज लॉगीन ला अपलोड करणे आवश्यक आहे.
आवेदनपत्रात विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांमार्फत, प्राचार्य / विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी, आवश्यक त्या कागदपत्रांच्या सत्यप्रती साक्षांकित नसल्यास अथवा ऑनलाईन भरलेला अर्ज सादर न केल्यास तसेच विहित मुदतीत आवेदनपत्र प्राप्त न झाल्यास आवेदनपत्र विचारात घेतले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ राजीव बोरकर यांनी केले आहे. तसेच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आशीष देशपांडे, संचालक लॉजिक्सपायर टेक्नॉलॉजीस प्रा लि 8421894334 या क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीकरीता संचालक, विद्यार्थी विकास यांचे 8600285857, 8855083964, directorsd@sgbau.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.