डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पहिल्यांदाच ‘टॉप ५०’ मध्ये
‘एनआयआरएफ’ रँकिंग जाहीर
देशात ४६ वा तर राज्यात चौथा क्रमांक
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’ NIRF रँकिंगमध्ये पहिल्यांदाच ‘टॉप ५०’मध्ये स्थान पटकावले आहे. देशातील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये ४६ वा तर राज्यातून चौथ्या क्रमांकाचे रँकिंग विद्यापीठाला मिळाले आहे.
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने एन आय आर एफ अर्थात ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या वतीने दरवर्षी रँकिंग जाहीर करण्यात येते. यंदाचे रॅकिंग सोमवारी (दि १२) दुपारी जाहीर करण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या रँकिंग मध्ये देशात ४६ वा तर राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. सदर रँकिंग सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच टॉप फिफ्टी मध्ये विद्यापीठ आले आहे.
सदर रँकिंग घोषित झाल्याची समजताच कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ गुलाब खेडकर यांनी कुलगुरू डॉ विजय फुलारी यांची सायंकाळी भेट घेऊन अभिनंदन केले. मार्चमध्ये या रँकिंग संदर्भात विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर माहिती पाठवण्यात आली होती. देशातील सर्व विद्यापीठांनी पाठवलेल्या माहितीची पडताळणी करून येणारे रँकिंग घोषित करण्यात आले आहे. यापूर्वी विद्यापीठाने पहिल्या शंभरात क्रमांक मिळवलेला आहे. तर २०२३ मध्ये पहिल्या १०० विद्यापीठांमध्येही क्रमांक येऊ शकला नव्हता. या पार्श्वभूमीवर २०२३ च्या रँकिंगमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्या पन्नासमध्ये येऊन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
गुणवत्तेत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न : कुलगुरू
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘एनआयआरएफ रँकिंग’ मध्ये देशातील पहिल्या ५० विद्यापीठात क्रमांक मिळवला ही आनंदाची गोष्ट आहे. शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा याबाबतीत सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील सर्वांनी उत्तम प्रकारे नियोजन केले . आगामी काळात देखील सामूहिक प्रयत्नातून विद्यापीठाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील .
कुलगुरू डॉ विजय फुलारी