एमजीएम विद्यापीठात ‘वदतु संस्कृतम्’ कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या भारतीय तथा विदेशी भाषा संस्थेतील संस्कृत विभाग आणि संस्कृत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत भाषा शिकण्याची आवड असलेल्या नागरिकांसाठीची ‘वदतु संस्कृतम्’ ही दोन दिवसीय कार्यशाळा विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभागृहात यशस्वीपणे पार पडली. या दोन दिवसीय कार्यशाळेत संस्कृत भाषेचे अभ्यासक डॉ अजय निलंगेकर यांनी मार्गदर्शन करीत सहभागी विद्यार्थी व नागरिकांना संस्कृत भाषा बोलण्यास शिकविले.
यावेळी, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, संचालक डॉ के पी सिंह, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. कार्यशाळेच्या समारोप सोहळ्यात वय वर्षे ६५ असलेल्या आणि कधीकाळी बालवाडी सेविका पदावर कार्य केलेल्या नलिनी लेकुरवाळे यांनी संस्कृतमधून बोधकथा सांगून आपले संस्कृतविषयक प्रेम व्यक्त केले. तसेच अनेक सहभागी नागरिकांनी संस्कृत भाषेतून आपला परिचय सांगून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
लोकाग्रहास्तव एमजीएम विद्यापीठाच्या भारतीय तथा विदेशी भाषा संस्थेच्यावतीने संस्कृत भाषा वाचायला, लिहायला व बोलायला शिकण्यासाठी पुढील महिन्यापासून ‘संस्कृत भाषा प्रमाणपत्र’ हा ३ महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यशाळेचे प्रास्ताविक संचालक डॉ के पी सिंह यांनी, सूत्रसंचालन डॉ रेहाना सय्यद यांनी केले तर आभार संस्कृत विभागप्रमुख डॉ प्रज्ञा कोनार्डे यांनी मानले.