एमजीएम विद्यापीठाला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या शिष्ट मंडळाची भेट
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या शिष्टमंडळाने आज महात्मा गांधी मिशन विद्यापीठास भेट देऊन विद्यार्थ्यांशी संशोधन क्षेत्रातील विविध संधी तसेच व्यवसायभिमुखता इत्यादी विषयांवर संवाद साधला. यावेळी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, आयोगाचे सदस्य – सचिव डॉ.एन.जी.शाह, सल्लागार डॉ.ए. व्ही. सप्रे, आय आयटी मुंबईचे प्रा.संकल्प प्रताप, डॉ.निशिकांत टीकेकर, डॉ. गौतम कुमार महापात्रा, थिरवीराजा, नाविद पटेल, संचालक डॉ. अण्णासाहेब खेमनर, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना शाह यांनी व्यवसाय कसा असायला हवा याची माहिती दिली. तसेच यशस्वी व्यवसायासाठी ऑब्सर्व्ह (निरीक्षण) मेझर (मोजमापण), डिझाईन (रेखांकण), बिल्ट (बांधकाम), टेस्ट अँड व्हॅलिडेट (चाचणी आणि तपासणी) या गोष्टी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी सल्लागार डॉ.ए. व्ही. सप्रे, प्रा.संकल्प प्रताप, निशिकांत टीकेकर, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी उद्योजकता विषयावर संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनीषा सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी मानले.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अप्लिकेशन्सच्या प्रगती, प्रसार आणि संवर्धनासाठी समाजातील विविध समस्या आणि विकासात्मक कामांसाठी महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची स्थापना केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदल , विकास आणि प्रगतीसाठी माध्यम असणे; विद्यापीठे, संशोधन आणि विकास संस्था, उद्योग आणि इतर संस्थांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगांच्या विकासासाठी आणि सुधारीत करण्यासाठी क्षैतिज संवाद साधण्यासाठी मुख्य प्रेरक म्हणून आयोग कार्य करतो.