कृषि महाविद्यालयात राज्यस्तरीय साखर व संलग्न उद्योग परिषद – २०२४ संपन्न

साखर उद्योगामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची गरज – कुलगुरु डॉ पी जी पाटील

परिषदेत विविध कार्यासाठी सामंजस्य करार

राहुरी : राज्यातील साखर आणि संलग्न उद्योग पर्यावरणीय प्रश्नांच्या अनुषंगाने विशिष्ट संक्रमणातून जात आहेत. तसेच जागतिक हवामान बदल, अतिपाणी आणि अमर्यादित रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचे खालवलेले आरोग्य, बाढ़ता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, कमी उतारा अशा आव्हानांना ऊस उत्पादक सामोरे जात आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार साखर उद्योगांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत व्हावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्विसेस लि पुणे, साखर आयुक्तालय, पुणे आणि दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व संलङ उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाक्ततेसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय साखर व संलग्न उद्योग परिषद २०२४ चे आयोजन कृषि महाविद्यालय, पुणे येथील डॉ शिरनामे सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे.

या परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ पी जी पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्याचे साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे येथील मिटकॉनचे कार्यकारी संचालक आनंद चलवादे, सोलापूर येथील जकराया शुगर लि चे चेअरमन अॅड बी बी जाधव, सांगली येधील सद्‌गुरु श्री श्री साखर कारखाना लि.चे चेअरगन एन शेशागिरी नारा, कोल्हापूर येथील दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष जितेंद्र माने देशमुख, भारत सरकारच्या पर्यावरण समितीचे सदस्य डॉ एस व्ही पाटील, कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के, कृषि महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्टाता डॉ महानंद माने, पुणे येथील विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले आणि पर्यावरण समितीचे सदस्य राहुल मुंगीकर उपस्थित होते.

Advertisement

कुलगुरू डॉ पी जी पाटील पुढे म्हणाले की या दोन दिवसीय साखर परिषदेमध्ये हवामान बदल आणि शाषतता, चक्रीय अर्थव्यवस्था, पर्यावरण संरक्षण, कार्बन क्रेडिट, शासनाचे धोरणे आणि प्रदूषणा नियंत्रण या विषयांवर विविध तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेमुळे साखर व संलङ उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी नवीन दालने समोर येणार आहेत. ऊस संशोधनामध्ये कृषि विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे मोठे योगदान आहे. आत्तापर्यंत या संशोधन केंद्राने उसाचे १७ वाण दिलेले असून राज्यातील ऊस उत्पादक क्षेत्रापैकी ८६ टक्के क्षेत्र आणि देशातील ऊस उत्पादक क्षेत्रापैकी ५६ टक्के क्षेत्र है विद्यापीत विकसित ऊस वाणाखाली आहे.

यावेळी साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार आपल्या प्रमुख मार्गदर्शनात म्हणाले की राज्याच्या अर्थकारण, राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीमध्ये साखर कारखान्यांचा मोठा वाटा आहे. सर्व साखर कारखान्यांनी पर्यावरणपूरक कामे करण्यासाठी शासनाने विविध धोरणे आखलेली आहेत, साखर कारखान्यांनी मूल्यवर्धित उत्पादनांवर अधिक काम करणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांना कॉम्प्रेस बायोगॅस आणि ग्रीन हायड्रोजनसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या साखर परिषदेचे पर्यावरणपूरक कामांसाठी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा जकराया शुगर लि या कारखान्याशी पर्यावरणपूरक ऊस उत्पादनासाठी व कार्बन क्रेडीटसाठी आणि सद्‌गुरु श्री श्री साखर कारखाना यांच्याबरोबर पर्यावरणपूरक शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान विस्तारासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या सामंजस्य करारावर कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ विठ्ठल शिर्के आणि कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव, एन शेशागिरी नारा यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ महानंद माने यांनी केले तर सामंजस्य कराराचे वाचन डॉ धर्मेंद्रकुमार फाळके यांनी केले.

मिटकॉनचे आनंद सरोदे यांनी जागतिक हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे परिणाम याबर सादरीकरण दिले. याप्रसंगी डॉ बी बी जाधव, शेषागिरी नारा, राहुल मुंगीकर, एस व्ही पाटील, अजित चौगुले, जितेंद्र माने देशमुख, डॉ विठ्ठल शिर्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये एकुण सहा सत्रांमध्ये हवामान बदल आणि शाश्वतता, चक्रीय अर्थव्यवस्था, साखर आणि संबंधीत उद्योगातील प्रदुषण नियंत्रण कल व पर्यावरण संरक्षणासंबंधी सिंहावलोकन या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ महानंद माने व डॉ धर्मेद्रकुमार फाळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पल्लवी सुर्यवंशी यांनी तर आभार डॉ संदिप जाधव यांनी मानले. या दोन दिवसीय परिषदेसाठी राज्यातील साखर कारखान्यांचे पर्यावरण अधिकारी, चौफ केमिस्ट, प्रदुषण विभागाचे तज्ज्ञ आणि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page