पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शनिवारी G-20 युवा संवाद’ कार्यक्रम
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार, आमदार, जी ट्वेंटीचे सचिव राहणार उपस्थित
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विकासार्थ विद्यार्थी यांच्या तर्फे ‘जी ट्वेंटी युवा संवाद- भारत @2047’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 22 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे हा कार्यक्रम होणार असून शनिवारी सकाळी दहा वाजता याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भारत सरकारच्या जी ट्वेंटीचे सचिव आकाश झा यांचे बीजभाषण होणार आहे. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत स्टार्टअप आणि उद्योजकता या विषयावर पुण्याच्या मैत्रेयी कांबळे यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. यावेळी आमदार सर्वश्री सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, शहाजीबापू पाटील, जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे हे असणार आहेत. दुपारी दोन वाजता सहभागी स्वयंसेवक चर्चासत्र होणार आहे. पंचप्रण हे विषय असून यामध्ये आमदार सर्वश्री रणजीतसिंह मोहिते-पाटील, राम सातपुते, समाधान अवताडे, यशवंत माने, अरुण लाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ऍड. अनिल ठोंबरे हे राहणार आहेत. समारोपाचा कार्यक्रम दुपारी 3.30 वाजता होणार असून प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. रामेश्वर कोठावळे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत हे राहणार आहेत. कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे, विकासार्थ विद्यार्थीचे निमंत्रक प्रा. तात्यासाहेब घावटे हे कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.