एमजीएम विद्यापीठात ‘मिथक समजुन घेताना’ विषयावरील चर्चासत्र संपन्न
सृष्टीमध्ये घडणाऱ्या गोष्टींची कारणे शोधण्याकरिता मिथकांची निर्मिती; एमजीएममधील चर्चासत्रातून मान्यवरांचा सूर…
छत्रपती संभाजीनगर : मिथक हे काहीतरी सांगणे असून मिथकातून परंपरांची निर्मिती झालेली आहे. सृष्टीमध्ये घडणाऱ्या गोष्टींची कारणे शोधण्याकरिता मिथकांची निर्मिती झाली असून या माध्यमातून पुढे वेगवेगळ्या कथा तयार होत गेल्या, असा सूर येथील चर्चा सत्रात मान्यवरांनी काढला.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संस्था आणि वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिथक समजुन घेताना’ या विषयावरील चर्चासत्र आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृह येथे यशस्वीपणे संपन्न झाले. या चर्चासत्रात मिथक शास्त्राचे अभ्यासक डॉ अशोक राणा यांच्याशी इतिहास व पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक आशुतोष पाटील यांनी संवाद साधला, चर्चेमधे विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.
या कार्यक्रमास एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अधिष्ठाता डॉ रेखा शेळके, अधिष्ठाता डॉ प्राप्ती देशमुख, संचालिका डॉ झरताब अंसारी, प्रा आशुतोष पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते. चर्चासत्रात आर्या गोरे, नरेंद्र आश्रुजी काळे, पवन जाजु, वैष्णवी वडेकर, सई पवार, श्रीकृपा डुघरेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना डॉ अशोक राणा म्हणाले, मिथक या शब्दाची निर्मिती इंग्रजीतील ‘मिथ’ या शब्दापासून झाली असून हिंदी साहित्यातील प्रसिद्ध लेखक हजारी प्रसाद द्विवेदी यांनी ‘मिथ’या शब्दाला संस्कृतचा ‘क’ हा प्रत्यय लावला. आणि अशाप्रकारे मिथक या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. मिथक शब्दाला काल्पनिक, पुराणकथा म्हणून आपल्याकडे ओळखले जाते. मुळ सत्याला रंजकपणे मांडण्यासाठी शब्दांचे केलेले अवगुंठण म्हणजे मिथक होय.
कावळा आणि चिमणी यांची गोष्ट आजही आपणास माहिती आहे. ही कथा ७५० वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी एका मुलीला सांगितली होती. अशा तरीने परंपरेने चालत आलेल्या काही कथा असतात. त्याचप्रमाणे ‘तळीराम’ हा शब्द एका नाटकातून पुढे आला आणि एका दारुड्या माणसाचे मिथक म्हणून याकडे आपण पाहतो. मिथक कोणीही तयार करू शकते कारण मिथक निर्मितीची प्रक्रिया आपल्या मनात सातत्यपूर्ण सुरू असते.
मिथक नाकारणारे आणि मान्य करणारे असे दोन्ही वर्ग समाजात आहेत. या दोन्ही वर्गांना मिथक म्हणजे काय, हे माहिती नसते. यामध्ये सम्यक मार्गाने चालणारा तिसरा वर्गही आहे. मिथकाकडे नकारात्मकतेने पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोण आपल्या समाजात तयार झाला आहे.सर्वसामान्य नागरिकांसह विद्वानांमध्ये हा दृष्टिकोण आपल्याला पाहायला मिळतो. मिथकात इतिहास असतो पण मिथक म्हणजे इतिहास नसल्याचे यावेळी डॉ.अशोक राणा यांनी सांगितले.
डॉ अशोक राणा पुढे बोलताना म्हणाले की, एमजीएम विद्यापीठात झालेले हे चर्चासत्र महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या या विषयावरील चर्चासत्रातील हे सर्वात यशस्वी आणि मोठे चर्चासत्र होते. विद्यार्थ्यांनी यामध्ये जो काही सहभाग आणि ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न उपस्थित केले, ते कौतुकास्पद होते.
या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक नवी दृष्टी मिळण्यास मदत झाली. या जगामध्ये असंख्य विषय आहेत. या जगामध्ये अभ्यासासाठी खूप सारे विषय विद्यार्थ्यांसमोर आज आहेत. विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी ग्रंथ, इंटरनेट याचा अभ्यासासाठी वापर करावा, असे प्रतिपादन कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा आशुतोष पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार सई पवार या विद्यार्थिनीने मानले.