‘स्वारातीम’ विद्यापीठात दरवर्षी पाच वृक्षारोपण व संवर्धन करणे बंधनकारक
झाडे लावून संवर्धन केल्याचा पुरावा दिल्याशिवाय पदवी मिळणार नाही
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सर्व संलग्नित महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांना पर्यावरण हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रति वर्ष किमान पाच झाडे लावावी व त्याचे संवर्धन करावे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही. असे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी कळविले आहे. राष्ट्रीय सेवा योजना तर्फे या बाबतीत काही मार्गदर्शक सूचना महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला बोलावून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व पटवून द्यावे. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये पर्यावरण हा विषय शिकवणारे प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन केल्याशिवाय पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही याची जाणीव करून द्यावी.
महाविद्यालयाने स्वातंत्र्य कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे लिंक तयार करून देण्यात यावी. त्या लिंकमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, महाविद्यालयाचे नाव, मोबाईल नंबर, कोणते झाड कुठे लावले याचा तपशील द्यावा. विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचा जिओ टॅग फोटो जेपीजी किंवा पीडीएफ मध्ये काढून दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यास सांगावा. जिओ टॅग फोटो घेतल्यामुळे त्यावर दिनांक, स्थळ व वेळ कळेल. सदर वृक्षारोपण १ ऑगस्ट ते ३० ऑक्टोबर दरम्यान करण्यात यावे. वृक्षरोपण घर, परिसर, मंदिर, रस्त्याच्या बाजूला, स्वतःच्या शेतात किंवा अन्य ठिकाणी करण्यात यावे. दर महिन्याच्या ५ ते १० तारखेच्या दरम्यान झाडांचा फोटो अपलोड करण्यात यावा. जेणेकरून झाडांची देखभाल व्यवस्थित होत आहे की नाही हे कळेल. झाडे लावताना प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, अर्जुन, बकुळ, हेळा, भावा, करंज, आकाश मोगरा, चिंच किंवा इतर कोणत्याही फळांची झाडे लावण्यात यावीत.
या राष्ट्रहित कार्याला चालना मिळावी म्हणून महाविद्यालयाने प्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनाही यामध्ये समाविष्ट करून घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धनाबद्दल रुची निर्माण करावी. ज्या गावात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर घेण्यात येते त्या कालावधीत सदर गावात वृक्ष लागवड करून ग्रामस्थांना ती झाडे जगविण्यासाठी दत्तक द्यावीत. या माध्यमातून गावागावात वृक्ष चळवळ उभी होण्यास मोठी मदत होईल.