माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे शनिवारी उद्घाटन
‘पदम्’ पुरस्कारार्थीचा गौरव सोहळा
‘विद्यापीठ गेट सुशोभिकरण’चेही उद्घाटन
औरंगाबाद : भारताचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या शनिवारी (दि.२२) येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली. या सोहळयासाठी माजी राष्ट्रपती मा.राम नाथ कोविंद यांनी संमती दिली असून विस्तृत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुमारे पाच कोटी रुपये खर्चून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. तसेच एोतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर विद्यापीठाच्या नाटयगृहात ‘पदम्’ पुरस्कारांर्थींचा सन्मान सोहळा होणार आहे. यामध्ये पदमभूषण पुरस्कार प्राप्त डॉ.अशोक कुकडे यांचा गौरव करण्यात येईल. तसेच पद्मश्री पुरस्कारांने गौरविलेले डॉ.यु.म.पठाण, डॉ.प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीश प्रमुणे, शब्बीर सय्यद, ना.धो.महानोर व कषीतज्ज्ञ श्रीरंग देऊबा लाड यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच पद्मश्री स्व.फातेमा झकेरिया व पद्मश्री स्व.डॉ.गंगाधर पानतावणे यांचा मरणोत्तर गौरव करण्यात येणार असून हा सन्मान कुटूंबिय स्विकारणार आहेत. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. विद्यापीठाच्या नाटयगृहात शनिवारी (दि.२२) सायंकाळी ५ वाजता हा सोहळा सुरु होईल. या सोहळयास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणपत्रिका आवश्यक असून निमित्रांतनी अर्ध्या तास अगोदर स्थानापन्न व्हावे, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळविले आहे.
विद्यापीठासाठी ऐतिहासिक क्षण : मा.कुलगुरु
दहा वर्षांपुर्वी भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आले होते. आता या सोहळयाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे येत आहेत. विद्यापीठाच्या इतिहासातील हा एक गौरवाचा क्षण असणार आहे. परिवर्तनाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणा-या ‘विद्यापीठ गेट’ चे सुशोभिकरण व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची इमारत माझ्या कार्यकाळात पुर्ण झाली, याचा मनस्वी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.