अमरावती विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज : भारतीय युवकांसाठी दीपस्तंभ’ विषयावर व्याख्यान संपन्न
कौशल्य विकासाचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच रचला – डॉ सतपाल सोवळे
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच ख-या अर्थाने कौशल्य विकासाचा पाया रचला गेला. युध्दनीती, क्रिटीकल थिंकिंग, क्रिएटीव्हिटी, कम्युनिकेशन्स, कोलाबोरेशन्स यासारखे कौशल्य महाराजांनी त्या काळातच युवकांसह आपल्या अष्टप्रधान मंडळ आणि शासनकर्त्यांना दिले होते, असे विचार प्रख्यात लेखक व विचारवंत डॉ सतपाल सोवले यांनी मांडले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या समापन सोहळ्यानिमित्त ३ ऑगस्ट रोजी विद्यापीठातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये व्याख्यान देतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य प्रा श्रीकांत काळीकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ निलेश कडू यांची उपस्थिती होती.
डॉ सोवळे पुढे म्हणाले, महाराजांनी परकियांचे आक्रमण आणि सत्ता उलथवून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांची युध्दनीती प्रचंड होती. त्यामुळे मोघलांच्या ताब्यात असलेले प्रांत महाराजांनी आपल्या युध्दनीतीने काबिज केले. त्यातीलच एक कौशल्य म्हणजे महाराजांनी आपणासह सैनिकांची आग्राहून केलेली सुटका होय. तर आणखी एक कौशल्य म्हणजे महाराजांनी मोघलांच्या शासन काळातील बदल घडवून आणण्यासाठी केलेला राज्याभिषेक होय. आपल्या सैनिकांना देखील महाराजांनी कठोर आज्ञा दिल्या होत्या. सैनिकांचे कुठेही वास्तव्य असल्यास त्या परिसरातील शेतक-यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या आज्ञा महाराजांच्या होत्या. दुष्काळी परिस्थितीतही महाराजांनी शेतक-यांकडून शेतसारा वसूल करण्याऐवजी त्यांना मदत केली होती. एकूणच छत्रपती शिवाजी महाराज युवकांसाठीच नव्हे, तर अबालवृध्दांसाठी दीपस्तंभ असल्याचे डॉ सोवळे म्हणाले.
शिवछत्रपतींचे विचार विद्यार्थ्यांनी अंगिकारावे – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
सध्याच्या परिस्थितीत होणा-या घटना पाहता, विद्यार्थ्यांनी आपले आईवडील, गुरूजन, समाज, राष्ट्राला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, याची जाण ठेवावी. शिवछत्रपतींचे विचार अंगिकारल्यास अशा प्रकारच्या आयोजनाचे उद्दिष्ट सफल होईल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी अध्यक्षीय भाषण करतांना केले. ते पुढे म्हणाले, महाराजांनी त्या काळातच वृक्ष संवर्धन केले होते. नागरिकांना विविध कामांसाठी लाकडांची गरज असते, परंतु कोणते वृक्ष तोडण्यात यावे, हे महाराजांनी बजावून सांगितले. यातून महाराजांचे द्रष्टेपण देखील दिसून येते. विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन सामाजिक आव्हाने पेलावीत. भारताला विश्वगुरू करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची आहे, असे सांगून व्याख्यातांनी अतिशय उत्कृष्टरित्या विषयाची मांडणी केली आहे, त्यामुळे उपस्थित श्रोतागण सुध्दा मंत्रमुग्ध झाल्याचे ते म्हणाले.
संत गाडगे बाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीपप्रज्वलन आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर यांनी व्याख्यानामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले यांनी, तर आभार रा से यो संचालक डॉ निलेश कडू यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, रा से यो चे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वरश्री केतकर हिने गायिलेल्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.