हिंदी विश्वविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात गुरुवार, ०१ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विश्वविद्यालयाच्या आचार्य रघुवीर प्रशासकीय भवनात कुलगुरू प्रो कृष्णकुमार सिंह आणि कुलसचिव प्रो आनन्द पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परीक्षा नियंत्रक कादर नवाज खान, शिक्षण विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ हेमचंद्र ससाणे, डॉ अभिषेक कुमार सिंह, सुरक्षा अधिकारी सुधीर खरकटे यांच्यासह सर्व सुरक्षा कर्मचारी व कर्मचाऱ्यांनीही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.
विश्वविद्यालयाच्या गुर्रम जाशुवा सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर-सिदो-कान्हू मुर्मू दलित व जनजातीय अध्ययन केंद्रा द्वारे व्याख्यान आयोजित करून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे प्रभारी डॉ बालाजी चिरडे होते. वक्ते म्हणून दूर शिक्षा निदेशालयाचे सहायक प्राध्यापक डॉ संदीप सपकाळे यांनी संबोधित केले. ते म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी जनसामान्याची भाषा वापरत वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षापर्यंत ९ पोवाडे, २० कथासंग्रह आणि अनेक कवितांची रचना केली.
हिंदी साहित्य विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ कोमल कुमार परदेशी म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्या ९ कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झाले असून, ९ चित्रपटांमध्ये ते स्वतः अभिनेते झाले आहेत. त्यांनी चित्रपट दिग्दर्शित केले, पटकथा आणि गाणीही लिहिली. अध्यक्षीय भाषणात डॉ बालाजी चिरडे यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की टिळकांनी केसरी, मराठा वृत्तपत्रे काढली. गीता रहस्य ग्रंथ लिहिला. वर्षानुवर्षे भारतीय राजकारणावर त्यांचा प्रभाव राहिला आहे. ते भारतीय असंतोषाचे जनक म्हणून प्रसिद्ध होते असेही ते म्हणाले.
या प्रसंगी डॉ उमेश कुमार सिंह, डॉ किरण कुंभरे, डॉ राकेश सिंह फकलियाल, डॉ मनोज तिवारी, डॉ मनोज मुनेश्वर, बी एस मिरगे, भालचंद्र जमधाडे, संघर्ष डहाके, तस्लीमा नसरीन, विजय कुंभरे, विवेक मिश्र, मंगेश गजघाटे आदी उपस्थित होते.