अमरावती विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा पदभार सीए पुष्कर देशपांडे यांनी स्वीकारला
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदी सीए पुष्कर देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवार दि १ ऑगस्ट, २०२४ रोजी सीए पुष्कर देशपांडे यांनी आपल्या पदाचा पदभार प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मंगेश वरखेडे यांच्याकडून स्वीकारला.
सीए पुष्कर देशपांडे हे मूळचे अकोला येथील रहिवाशी असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र स्टेट्स सिड्स कार्पोरेशन, अकोला (महाबीज) येथे २०१७ पर्यंत उपमहाव्यवस्थापक (अंकेक्षण) व वित्त या पदावर कार्य केलेले आहे. २०२७ ते २०२४ पर्यंत त्यांनी इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर (आय आय एम ) येथे व्यवस्थापक वित्त या पदावर कार्य केले असून त्यांना वित्त व लेखा विषयाच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. विशेष म्हणजे ते चार्टर्ड अकाऊन्टन्ट आहेत. सीए पुष्कर देशपांडे यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ विद्यापीठाच्या वित्त विषयक बाबींसाठी होईल. वित्त विभागातील सर्व व्यवहाराचे संगणकीकरण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला आहे.
कमी मनुष्यबळामध्ये वित्त विभाग सक्षम करण्यावर त्यांचा भर राहणार असून वित्तीय कामकाजाचे संपूर्ण संगणकीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना ऑनलाईन वित्तीय सुविधा देण्यावर त्यांचा भर राहणार आहे. त्यांचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.