बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांसाठी शिवाजी विद्यापीठात व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन
बिगर शासकीय संस्थांनी कार्याभिमुखता व पारदर्शकता जोपासावी – कुलगुरू डॉ डी टी शिर्के
कोल्हापूर : बिगर शासकीय संस्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा इतिहास असून संबंध जीवसृष्टीच्या कल्याणामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कार्याभिमुख व पारदर्शक संस्थांचा इतिहास व वर्तमान चांगला असून अशा संस्थांचे भविष्य देखील दैदिप्यमान असणार आहे. तेव्हा बिगर शासकीय संस्थांनी आपली कार्याभिमुखता व पारदर्शकता वाढविली पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ डी टी शिर्के यांनी केले ते डोटीसस्टार बिझनेस सोलूशन्स प्रा लि कंपनीच्या सहयोगाने सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र यांच्यावतीने आयोजित बिगर शासकीय संस्था विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी प्रा डॉ एस एस महाजन अध्यक्षस्थानी होते.
पुढे बोलताना कुलगुरू म्हणाले, बिगर शासकीय संस्थांना अर्थसहाय्य देणारे व घेणारे या दोहोंतील संबंध पारदर्शक असायला हवेत. या संस्थांनी केलेली कामे व त्यांनी त्यासाठी वापरलेला निधी हा सार्वजनिकरित्या सर्वांसाठी उपलब्ध असायला हवा. सीएसआर निधी देण्यास पात्र असणाऱ्या कंपन्यांनी भौगोलिक कारणे पुढे न करता चांगली कामे करणाऱ्या संस्थांना विकासात्मक कार्यासाठी मदत केली पाहिजे. यावेळी धर्मादाय आयुक्तालयाचे अधीक्षक शिवराज नायकवडे व डोटीसस्टार बिझनेस सोलूशन्सचे तुषार कामात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अविनाश भाले यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा डॉ एस एस महाजन म्हणाले, बिगर शासकीय संस्थांनी केवळ नफ्याचा हिशोब न ठेवता आपल्याला कशाप्रकारे तोटा सहन करावा लागत आहे याचेसुद्धा परीक्षण केले पाहिजे. संस्थांच्या हिशोबामध्ये पारदर्शकता असायला हवी. कार्यक्रमाचे आभार डॉ किशोर खिलारे यांनी मानले.
या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बिगर शासकीय संघटना, तिचे कार्य व स्वरूप, बिगर शासकीय संस्थांना मिळणारे अर्थसहाय्य, विविध विकासात्मक प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील संस्था, बिगर शासकीय संस्थांना मिळणारे शासकीय अर्थसहाय्य आणि शासनाची भूमिका, अर्थसहाय्यासाठी प्रकल्प अहवाल कसा तयार करावा?, संस्थात्मक सभा व कार्यक्रम इत्यादींचे अहवाल लेखन, संस्थेचे आर्थिक नियोजन व वार्षिक लेखापरीक्षण अहवाल इत्यादींबाबत या विषयातील तज्ञ अविनाश भाले, धीरज जाधव, बिरेन धरमसी, सुरेश विटेकर, शरद अजगेकर इत्यादींनी मार्गदशन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बिगर शासकीय स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संयोजानामध्ये शरद पाटील, डॉ किशोर खिलारे, अविनाश वाघमारे, विदिमा कामत, अनुरुद्ध पाटील, शैलेश बांदेकर, विक्रम कांबळे इत्यादींनी सहकार्य केले.