दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे बैठक संपन्न
वैद्यकीय शिक्षकांना सामाजिक योगदानाकरिता दिशादर्शन
वर्धा : राष्ट्रीय वैद्यकीय आयोग व राष्ट्रीय वैद्यकीय संघटना यांच्याद्वारे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी (मेघे) येथील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्रातील वरिष्ठ वैद्यकीय शिक्षकांची बैठक घेण्यात आली. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शिक्षकांच्या योगदानाकरिता दिशादर्शक असलेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील ६० वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठातांसह सुमारे २०० प्रतिनिधी सहभागी झाले.


सावंगीच्या दत्ता मेघे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू तथा निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. दैनंदिन जीवनात डॉक्टरांनी समाज सुधारकाची भूमिका बजावावी, असे उद्गार डॉ कानिटकर यांनी उद्घाटनपर भाषणात काढले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, नवी दिल्ली येथील स्नातक वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ अरुणा वणीकर, सदस्य डॉ विजयेंद्र कुमार, नैतिकता व वैद्यकीय नोंदणी मंडळाचे सदस्य डॉ योगेंद्र मलिक, राष्ट्रीय वैद्यकीय संघटनेच्या शिक्षक बैठकीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ विश्वम्भर सिंग, पश्चिम विभागाचे सचिव डॉ नरेंद्र पालीवाल, राज्याचे प्रभारी डॉ शरद आगरखेडकर, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ विंकी ऋगवंशी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ इब्राहीम अन्सारी, मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ललितभूषण वाघमारे, अधिष्ठाता डॉ अभय गायधने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या एक दिवसीय बैठकीत विविध सत्रे, गट चर्चा तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी शिक्षकांचे योगदानाचे याबाबत अनुभवकथन ठेवण्यात आले होते. बैठकीला उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी मेघे अभिमत विद्यापीठातील आभासी व प्रायोगिक शिक्षण विभाग, संग्रहालय आणि संशोधन विभागातील सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी संयोजन समितीद्वारे अतिथींना ‘दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातीलकौशल्याधारित स्नातक वैद्यकीय शिक्षण’ या विषयावरील पुस्तक भेट देण्यात आले. बैठकीच्या समारोप सत्रात डॉ जयंती भडेसिया यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीच्या आयोजनात सावंगी (मेघे) आणि वानाडोंगरी, नागपूर येथील मेघे शिक्षण समूहाच्या कर्मचारी वृंदाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.