‘बामु’चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत २०० हून अधिक क्रेडिट कोर्सेस सुरू
एमकेसीएलशी सामंजस्य करार
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे एमकेसीएल च्या सहयोगाने २०० हून अधिक नावीन्यपूर्ण ‘iLike’ क्रेडिट कोर्सेस सुरू करण्यात येत आहेत. याविषयी दिनांक २९ जुलै रोजी विद्यापीठ आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रो रवी सरोदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, परीक्षा विभाग प्रमुख डॉ भारती गवळी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक वीणा कामथ, वरिष्ठ सरव्यवस्थापक डॉ रेवती नामजोशी व स्थानिक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
iLike क्रेडिट कोर्सेस विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील कम्प्युटर लॅब मध्ये ई-लर्निंग पद्धतीने शिकता येतील. सुरुवातीला VSC/SEC, OE/GE, तसेच AEC या एनईपी कोर्स ग्रुप अंतर्गत इलेकटीव्ह म्हणून विद्यार्थ्यांना कोर्सेस निवडता येतील. महाविद्यालयात iLike क्रेडिट कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे १५० हून अधिक महाविद्यालयांनी याविषयी पुढाकार घेतला आहे.
‘नवीन पिढी नवीन शिक्षणाच्या शोधात आहे. त्यांना नव्या स्वरूपाचे, नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे, त्यांना रोजगाराभिमुख बनवणे, हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांना व्यापक निवड उपलब्ध करून देणारे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित iLike कोर्सेस विद्यार्थ्यांच्या हिताचे ठरतील असा विश्वास असे माननीय कुलगुरू यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या iLike कोर्सेस मुळे पदवी शिक्षण अधिक अर्थपूर्ण होईल असे मत प्र-कुलगुरू यांनी व्यक्त केले.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना iLike कोर्सेस चा अधिकाधिक लाभ देता यावा यासाठी महाविद्यालयांनी विद्यापीठ आणि एमकेसीएलच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.