सोलापूर विद्यापीठात सुरू केलेल्या २५ अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती
१० वर्षांपासून पाठपुरावा; कुलगुरू प्रा महानवर यांच्या प्रयत्नास यश
विद्यार्थ्यांना दिलासा; उच्च शिक्षण विभागाचे निघाले पत्र
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर काही ठराविक अभ्यासक्रम व विभाग हे अनुदानित तत्त्वावर सुरू झाले. मात्र मागील दहा-पंधरा वर्षांमध्ये तीन कुलगुरूंच्या काळात नव्याने विविध २५ विभाग सुरू करण्यात आले. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळत नव्हती. याकरिता कुलगुरू प्रा प्रकाश महानवर व त्यांच्या टीमने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे यशस्वी पाठपुरावा केला व आता या सर्व अभ्यासक्रमांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
यासंदर्भाचे पत्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संचालकांनी शिक्षण सहसंचालकांकडे पाठविले आहे. या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना फटका बसत होता. त्याचा परिणाम विद्यापीठातील विविध विभागाच्या प्रवेश क्षमतेवर होत होता. यासाठी या सर्व अभ्यासक्रमांना शासनामार्फत देय असलेली शिष्यवृत्ती मिळणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी कुलगुरू प्रा प्रकाश महानवर तसेच प्र-कुलगुरू प्रा लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांची होणारी अडचण व समस्यांची जाणीव करून दिली.
आता महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि शिक्षण संचालक कार्यालय यांनी दि ७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार विद्यापीठातील विविध २५ अभ्यासक्रमांना शासनाची शिष्यवृत्ती देय राहील, असे पत्र निर्गमित केले आहे. हा विद्यापीठाच्या प्रगती मधील एक महत्वपूर्ण असे निर्णय आहे आणि त्यामुळे विद्यापीठाच्या प्रगतीस गती मिळणार आहे. विद्यापीठ परिसरातील विविध २५ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. कुलसचिव योगिनी घारे यांनी मान्यतेसाठी सातत्याने प्रयत्न करून यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे या सर्व अभ्यासक्रमांना आता शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कॅम्पसमधील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊन शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या २५ अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती
एम एससी मेडिसिनल केमिस्ट्री, एम एससी फिजिक्स (कंडेन्सड मॅटर फिजिक्स), एम एससी फिजिक्स (एनर्जी स्टडीज), एम एससी बायोस्टॅटिक्स, एम एससी मायक्रोबायोलॉजी, एम एससी बायोइन्फॉर्मेटिक्स, एम एससी बायोटेक्नॉलॉजी, एम ए योगा, बीव्होक जर्नालिझम अँड मासकम्युनिकेशन, एम ए इतिहास, एम ए राज्यशास्त्र, एम ए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एम ए मानसशास्त्र, एम कॉम, एम ए मराठी, एम ए हिंदी, एम ए इंग्रजी, एम ए संस्कृत, एम ए उर्दू, एम ए कन्नड, एम ए पाली, एम ए प्राकृत, एम ए म्युझिक, एम ए ड्रामाटिक्स, एम ए तबला व पखवाज या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
दि ७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार ६०५ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात राज्य शासनाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सद्यस्थितीत सुरू असलेल्या पंचवीस तसेच बृहत आराखड्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांना देखील शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. शिष्यवृत्तीमुळे मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे सोपे होते. यासाठी शिक्षण मंत्री तसेच सर्व अधिकाऱ्यांचे विद्यापीठाकडून आभार.
प्रा प्रकाश महानवर, कुलगुरू