एमजीएम विद्यापीठात वीरशासन पर्वानिमित्त’पंच परमेष्ठी’ संगीत मैफल संपन्न
छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण विश्वामध्ये उत्तम मंगलाचे प्रमाण म्हणून पंच परमेष्ठींना मानले जाते. यात अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि सर्व साधू यांचा समावेश आहे. या परमश्रेष्ठींना वंदन करणारी ‘पंच परमेष्ठी’ही विशेष संगीत मैफल एमजीएम विद्यापीठाच्या वतीने सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी रुक्मिणी सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी एमजीएम विद्यापीठाच्यावतीने कुलपती अंकुशराव कदम, अनुराधा कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर तर सकल जैन समाजाच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र दर्डा, मिठालाल कांकरीया, जे एम बोथरा, पुखराजजी पगारिया आणि संगीतकार डॉ संजय मोहड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जैन परंपरेतील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या वीरशासन जयंतीनिमित्त त्यांची कल्याणकारी शिकवण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावी या पवित्र हेतूने या संगीत मैफलीचे आयोजन केले होते. प्रोफेसर संजय मोहड यांनी या विशेष संगीत मैफलीची निर्मिती केली. आपल्या विज्ञाननिष्ठ निरूपणातून आणि आशयगर्भ गीत-संगीत रचनांमधून त्यांनी श्रोत्यांना केवली प्ररुपित तत्वज्ञानाची सम्यक अनुभूति दिली.
मेधा लखपति आणि विद्या धनेधर, वैष्णवी लोळे, सलोनी जुंबडे या विद्यार्थीनी कलावंतांनी भगवान महावीरांच्या रचना मोठ्या ताकदीने सादर केल्या. यातणमोकार मंत्र (देस), अभिनंदन करे (पहाडी), जिनके लबोंपे (मिश्र खमाज), वीर हुए महावीर (खमाज), बारहमासा (किरवाणी), वीरशासन वीरांचे (मिश्र पहाडी) आणि जय जिनेन्द्र (भैरवी) यांचा समावेश होता. या संगीत मैफलीत धीरेंद्र गावंडे (तबला), श्रीकांत पिसे (हार्मोनियम), निरंजन भालेराव (बासरी), राहुल जोशी (सहतालवाद्य) आणि निखिल लांडगे (पखवाज, ढोलक, ढोलकी) यांनी अत्यंत समर्पक आणि सुरेख साथसंगत केली.
मैफलीच्या प्रारंभी कृतज्ञता म्हणून सकल जैन समाजाच्या वतीने एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि अनुराधा कदम यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, प्रो संजय मोहड आणि संघमित्रा मोहड यांचादेखील यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी कलावंतांचा सत्कार केला.
या प्रसंगी पं संजय राऊत यांनी वीरशासन जयंतीचे महत्व विषद केले. या विशेष संगीत मैफलीसाठी सकल जैन समाजासह श्रोत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एमजीएम फिल्म अँड आर्ट्सचे विभागप्रमुख प्रा शिव कदम यांनी केले.