अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्यावतीने गुरू पौर्णिमेनिमित्त सोमवार दि २२ जुलै, २०२४ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे विभागप्रमुख डॉ के बी नायक, प्रमुख अतिथी म्हणून डॉ के यु राऊत उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ राऊत म्हणाले, सध्याच्या काळात गुरु – शिष्यांमधील नात्यांचा ओलावा सोशल मीडियामुळे कमी होत असून तो टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. सोशल मीडियाला दूर सारून शिक्षकांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ के बी नायक मार्गदर्शन करतांना म्हणाले, निसर्ग हा आपला प्रथम गुरु आहे. गुरुब्र्राम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्राम्ह तस्मंै श्री गुरवे नमाः या श्लोकाप्रमाणेच बुद्धम् शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि या विचारांमधून बुद्धांनी सुध्दा आपल्याला गुरूंचे महत्त्व सांगितले असल्याचे ते म्हणाले. सर्व धर्मांमध्ये गुरूचे महत्त्व प्रकर्षाने विषद केलेले आहे. निसर्गानंतर आई-वडील, प्राणिमात्र, वस्तू याकडून सुध्दा आपण सतत काही ना काही शिकत असतो. जीवनामध्ये ध्येय साध्य करावयाचे असेल, तर गुरू शिवाय पर्याय नाही, असे मोलाचे मार्गदर्शन डॉ नायक यांनी केले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्यात. डॉ के बी नायक आणि डॉ के यू राऊत यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रोहिणी देशमुख यांनी तर आभार सुनिता इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाला समाजशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील डॉ रोहिणी देशमुख, डॉ रोहिणी वावरे, सुनिता इंगळे, साधना इंगोले, संशोधक विद्यार्थी रमेश पवार, राजकुमार सरयाम, कर्मचारी उपेंद्र मिश्रा यांनी परिश्रम घेतले.