डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने खेडयांचे सर्वेक्षण करणार
खेड्यांच्या सर्वेक्षणातून ठरणार शिबिराचे विषय
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
कार्यक्रमाधिका-यांची कार्यशाळा
चार महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने चारही जिल्हयातील महाविद्यालयांच्या वतीने प्रथम सत्रात खेडयांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संबधित गावातील समस्या जाणून घेऊन त्या संदर्भातील निरोप शिबीर उपक्रम दुस-या सत्रात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ संचालक डॉ सोनाली क्षीरसागर यांनी दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक नियोजन आराखडा सन २०२४-२५ कार्यशाळा शुक्रवारी (दि १९) घेण्यात आली. प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली नाटयगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी रासेयो प्रादेशिक संचालक डॉ अजय शिंदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, नगरच्या शिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ जी एस गायकवाड, डॉ सोनाली क्षीरसागर आदींची मंचावर उपस्थिती होती.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ अजय शिंदे यांनी केले. ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनाही बलशाली भारताची युवा पिढी घडविण्यात मोलाचे योगदान देत आहे. तर डॉ जी एस गायकवाड यांनी रासेयो कार्यक्रमाधिकारी यांनी कशा पध्दतीने कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ सोनाली क्षीरसागर यांनी प्रस्थाविकात वर्षभराचा आराखडा व शिबिराच्या अंमलबजावणी याबद्दल मार्गदर्शन केले. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभराचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभरात डॉ प्रकाश कोंका, डॉ सचिन कोल्हे, डॉ परमेश्वर पुरी यांनी माय भारत पोर्टल, पीएफएमएस कार्यक्रमाची याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ समाधान इंगळे आणि सूत्रसंचालन तर डॉ दिनेश कोलते यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ ज्ञानेश्वर पाथ्रीकर, डॉ बी एल चव्हाण, डॉ गजानन दांडगे, प्रवीण तिदार, श्याम बन्सवाल, सुनील पैठणे आदींची परिश्रम घेतले.
यावेळी प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे व कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी महाविद्यालयातील जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेत जडण घडण झाल्याचे सांगितले. रासेयोच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्य केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुरस्कारांचे वितरण
विद्यापीठस्तरीय पुरस्कार २०२१-२२ चे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये शिवछत्रपती महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर जिल्हा), संत रामदास महाविद्यालय (जालना जिल्हा) र म अट्टल महाविद्यालय (बीड जिल्हा), शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय (धाराशिव जिल्हा) या महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या महाविद्यालयाचे डॉ हनुमान गाडे, डॉ बद्रिनाथ घोंगे, डॉ समाधान इंगळे व डॉ मनोज सोमवंशी यांना ’उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्काराने’ गौरविण्यात आले.