राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त वृक्षदिंडी संपन्न
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, औषधीनिर्माण शास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजना तसेच जीवन विद्या मिशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दिनांक १८ जुलै २०२३ रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व रसिका चौधरी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत जीवन विद्या मिशन नागपूर देखील शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. हा योगायोग साधत विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरातील मुख्य प्रवेश द्वारासमोरून वृक्षदिंडी काढण्यात आली. सोबतच १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, रसिका चौधरी , औषधीनिर्माण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद खेडेकर, उद्यान अधीक्षक श्री. प्रवीण गोतमारे, जीवनविद्या मिशन मुंबई ज्ञानसाधना केंद्र नागपूरचे अध्यक्ष श्री. सतीश देशमुख, सचिव श्री. विठ्ठलराव जावळकर, कोषाध्यक्ष श्री. गजानन कुकुडकर, अंकेक्षक श्री. चंद्रकांत वाघमारे, जीडीसी श्री. दत्तूजी वराडे, ज्येष्ठ प्रबोधनकार सौ. माणिकताई पळसकर, ज्येष्ठ नामधारक श्रीमती गंगाताई ईटणकर, औषधी शास्त्र विभाग प्राचार्य डॉ. प्रकाश इटनकर, नामधारक श्री. रामचंद्र खोत, श्री. रमेश साखरकर, श्री. राजू चरडे, युवानामधारक संकेत देवघरे, वेदांत पाटील इत्यादी आणि इतर जीवन विद्या फॉलोअर्स मंडळी उपस्थित होती.
वृक्ष लागवड व संवर्धन या प्रक्रियेतून विद्यापीठाचे विद्यार्थी, समाजातील नागरिक एकत्र येऊन वृक्ष आणि पृथ्वी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण हाच नारायण ही जीवन विद्या संकल्पना कार्यक्रमातून साकार झाली. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ एकत्र येत वृक्ष दिंडी परिसरातून काढण्यात आली. वृक्षारोपण स्थळी विश्व प्रार्थना म्हणण्यात आली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व रसिका चौधरी मॅडम यांच्या सह उपस्थित अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औषधीनिर्माण शास्त्र विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक योगेश निकम अनिल बदनाले, चक्रधर चंद्रवंशी, जगदीश बनकर, सुरभी भावे, प्रतीक्षा वाघ यांच्यासह अन्य स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
यशस्वी आयुष्यासाठी जीवन कौशल्य
यशस्वी आयुष्यासाठी जीवन कौशल्य प्राप्त व्हावे म्हणून जीवनविद्या मिशनचे ‘यशस्वी आयुष्याचे जीवन कौशल्य’ अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने औषधीनिर्माण शास्त्र विभागात सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचे शिल्पकार व्हावे म्हणून हा अभ्यासक्रम जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून तयार करण्यात आला. औषधी निर्माण शास्त्रीय विभागातील या अभ्यासक्रमाचे संयोजक म्हणून डॉ. प्रकाश ईटणकर व डॉ. दादासाहेब कोकरे हे काम पाहत आहे. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. निशिकांत राऊत यांच्या सहयोगाने अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सर्व महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.