‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान संपन्न
डॉ शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चरित्र्याचा हिमालय होते -ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुरेश सावंत
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ यांचे शिष्य आणि त्यांच्या शिस्तीत वाढलेले ‘मोडेल पण वाकणार नाही’ हा नियम पाळणारे डॉ शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चारित्र्याचा हिमालय होते. असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘आधुनिक भगीरथ’ चे संपादक डॉ सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.
ते दि १५ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे आयोजित डॉ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानामध्ये “डॉ शंकररावजी चव्हाण: व्यक्तित्व, नेतृत्व आणि कृतत्व” या विषयावर व्याख्यान देत होते. याप्रसंगी विचार मंचावर त्यांच्या समवेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ माधव पाटील, उपस्थितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ सुरेखा भोसले आणि डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ योगिनी सातारकर यांची उपस्थिती होती.
पुढे डॉ सावंत म्हणाले की, डॉ शंकरराव चव्हाण यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे एक क्रांतिकारी कर्तृत्व केले होते. त्याकाळी स्वामी रामानंद तीर्थांनी त्यांना उमरखेड कॅम्पमध्ये काम करण्याची जबाबदारी दिली होती. उमरखेड कॅम्पचे एक मोठे निजामशाही स्थळ उध्वस्त करण्यासाठी दोन हजार क्रांतिकारी तेथे एकत्र जमणार होते. त्यापैकी एक हजार क्रांतिकारी स्थानिकचे होते आणि एक हजार क्रांतिकारी बाहेरून येणार होते. वेळ व दिनांक ठरला पण अचानक मोठ्या पावसामुळे बाहेरून येणारे हजार क्रांतिकारी यांचे नियोजन रद्द झाले. हा निरोप डॉ शंकरराव चव्हाण यांना देण्यात आला. त्याकाळी त्यांनी जीवाची परवा न करता मोठ्या पूर आलेल्या नदीतून पोहून स्थानिक क्रांतिकारांना हा निरोप दिला. त्यामुळे तेथील हल्ला आणि स्थानिक एक हजार क्रांतीकार्यांचा जीव वाचला. असे कर्तृत्ववान क्रांतिकारी डॉ शंकरराव चव्हाण होते.
देशाच्या नकाशावर नदी-खोऱ्या धरणाचे नाव येण्यामध्ये डॉ शंकरराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. बारा वर्षे पाटबंधारे खात्याचे मंत्रीपद सांभाळून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन त्यांचे दारिद्र्य दूर केले. आज जर जायकवाडी आणि विष्णुपुरी धरण मराठवाड्यात नसते तर आपले बेहाल झाले असते. या धरणाचे श्रेय डॉ शंकरराव चव्हाण यांना जाते. म्हणूनच त्यांना जलपुरुष म्हणून संबोधले जाते.
नांदेड शहर नगरपालिकेच्या अध्यक्षपदापासून ते देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत सतत ५० वर्षे सक्रिय सार्वजनिक जीवन लोकनियुक्त नेता म्हणून ‘निष्कलंक नेतृत्व’ केले त्यामुळे डॉ शंकरराव चव्हाण ताठ मानेने जगले.
याप्रसंगी डॉ शंकरराव चव्हाण यांचे नातू तथा नांदेड विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी आपल्या आजोबाच्या काही आठवणी सांगितल्या ते म्हणाले आमचे आजोबा तथा नाना अतिशय शिस्तप्रिय होते. यावर त्यांनी एक किस्सा सांगितला एकदा डॉ शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री असताना बीएसएफ च्या विशेष विमानाने नांदेडला येणार होते. ठरलेल्या वेळेप्रमाणे स्वतः शंकरराव चव्हाण आणि नरेंद्र दादा चव्हाण विमानतळावर पोहोचले होते. पण कुसुमताईंना येण्यास वेळ लागत होता. त्यावेळी त्यांनी कुसुमताईंना फोन करून सांगितले आम्ही ठरलेल्या वेळेत निघणार आहोत. तुम्ही रेल्वेने या. सांगायचे तात्पर्य स्वतःच्या पत्नीसाठी त्यांनी शासकीय विमान निघण्यास उशीर होऊ दिला नाही. एवढे शिस्तप्रिय होते.
डॉ माधव पाटील अध्यक्षीय सामारोपामध्ये म्हणाले डॉ शंकरराव चव्हाण यांनी एका जिल्ह्याचा किंवा विभागाचा नव्हे तर पूर्ण देशाचा कायापालट होईल असे निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले होते. आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांचे गुरुवर्य असलेले स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठांमध्ये शैक्षणिक योगदान देत आहोत.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ योगिनी सातारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन या केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा डॉ मलिकार्जुन करजगी यांनी केले.