यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उन्हाळी परीक्षा दि २४ मे २०२४ ते दि १२ जून २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या. मुक्त विद्यापीठातील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतांशी नोकरी व व्यवसाय करीत असल्याने त्यांना परीक्षाकरिता सोयीचे व्हावे याकरिता परीक्षेचे आयोजन २० दिवसाच्या इतक्या अल्प कालावधीत करण्यात आले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपध्दतीचा अवलंब करून सर्व परीक्षांचे निकाल केवळ ३० दिवसांत जाहीर करण्यात आलेले आहेत. सर्व परीक्षांचे निकाल दि ८ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आले.
या उन्हाळी मे / जून २०२४ परीक्षेसाठी एकूण ११० शिक्षणक्रमांसाठी २४२ सत्रनिहाय परीक्षांसाठी एकूण ४ लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते व महाराष्ट्रातील ६०१ परीक्षा केंद्रांना ऑनलाईन व गोपनीय पध्दतीने १३०७ प्रश्नपत्रिका ह्यावेळेत उपलब्ध करून देण्यात येऊन, सदरच्या परीक्षा ह्या सुरळीतपणे पार पडल्या होत्या. या परीक्षेकरिता विविध विषयांच्या एकूण २९ लाख ९ हजार ८३१ उत्तपुस्तिकापैकी उपस्थित विद्यार्थ्यांच्या एकूण २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपुस्तिका तपासून वेळेत निकाल जाहीर करण्याची मोठी जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर होती.
विद्यापीठाने अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धतीचा अवलंब करून सर्व उत्तरपुस्तिकांचे कालमर्यादेत स्कॅनिंग करून महाराष्ट्रभर निश्चित केलेल्या १०८ ऑनलाईन मूल्यमापन (कॅप) केंद्रावरील नियुक्त परीक्षकांची बायोमेट्रिक ऑथेन्टीकेशनसह व फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या ओळखीची सत्यता पडताळून या उत्तरपुस्तिकांचे मूल्यांमापनाचे कामकाज Onscreen Digital Evaluationपद्धतीद्वारे त्वरित पूर्ण करून निकाल जाहीर केलेले आहेत. या उत्तरपुसातिका मुल्यमापणाचे कामकाज त्वरित पूर्ण होण्यासाठी विद्यापीठातील सर्व विद्याशाखा संचालक, ८ विभागीय केंद्रावरील विभागीय संचालक व तेथील कर्मचारी तसेच परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
सर्व परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्याकरिता कुलगुरू प्रा संजीव सोनवणे व प्र कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंग बिसेन यांचे वेळोवेळी मार्गदर्शन परीक्षा विभागास लाभले. सदरचे निकाल डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टलवरील https://ycmou.digitaluniversity.ac या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील Result या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
जाहीर झालेल्या निकालाच्या उत्तपुस्तिकांची छायांकित प्रत व पुनर्मुल्यांकन (Revaluation) करण्याची सुविधा परीक्षा विभागाने उपलब्ध करून दिलेली असून विद्यार्थ्यांने प्रथमतः विहित शुल्क ऑनलाईन भरून उत्तरपुस्तिकेची छायांकित प्रत प्राप्त केल्यानंतर दि २२/०७/२०२४ पर्यंत उत्तपुस्तिकांचे पुनर्मुल्यांकन (Revaluation) करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले सूचनापत्र क्र १३/०७/२०२४, दि ०९/०७/२०२४ नुसार कार्यवाही करावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.